रत्नागिरी : जुवे गावाला खाडीच्या पाण्याचा धोका

Aug 1, 2024 - 15:29
 0
रत्नागिरी : जुवे गावाला खाडीच्या पाण्याचा धोका

रत्नागिरी : शहराजवळील जुवे गावात मुसळधार पावसामुळे खाडीचे पाणी वाढले. तसेच भरतीमुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. अचानक मोठा पाऊस झाला तर जुवे गाव जलमय होईल त्यावेळी ग्रामस्थांनी कुठे जायचे, असा प्रश्न आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन व खासदार, पालकमंत्र्यांनी गावाला भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी जुवे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी केली आहे.

या संदर्भातील निवेदन संतोष चव्हाण यांनी सर्व शासकीय अधिकारी, जिल्हाधिकारी, मामलेदार, तलाठी व आमदार, खासदार, पालकमंत्री यांना दिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, जुवे गावामध्ये सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सभोवताली व बंधारा तंतोतंत पाण्याने भरलेला आहे. असाच जर पाऊस पडत राहिला तर उद्या हे पावसाचे पाणी, समुद्राचे भरतीचे पाणी एकत्र येऊन या पाण्याने संपूर्ण जुवे गाव जलमय होऊ शकते, प्रत्येकाच्या घरात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत होऊ शकते. 

त्यावेळी आम्ही हे जुवे गाव सोडून कुठे जायचे? कसे जायचे? कुठे जायला वाव नाही आहे. या स्थितीमध्ये जुवे गावामध्ये भेट देऊन तसेच शहानिशा करून आमची प्रलंबित कामे पूर्ण करून द्यावीत.

जुवे गावासाठी संरक्षक भिंतीचे जे काम अर्धे राहिलेले आहे ते पूर्ण करून संपूर्ण जुवे गावाचे या धोक्यापासून कसा बचाव होईल, यासाठी मदतीची मागणी चव्हाण यांनी केली आहे. प्रत्येक वर्षी होणाऱ्या या पूरपरिस्थितीमधून बाहेर काढावे, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. याबाबत प्रशासनाकडून लवकरात लवकर हालचाली व्हाव्यात, अशी जुवे गावातील ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

उपाययोजनांची गरज
जुवे गाव हे खाडीकिनारी वसलेले आहे. पर्यटनदृष्ट्या त्याचे महत्त्व वाढत आहे. त्याचा विचार करून प्रशासनाने योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे. किनारी भागात सुरक्षेसाठी संरक्षक बंधारा उपयुक्त ठरू शकतो. जेणेकरून पावसाळ्यात, भरतीवेळी पाणी लोकवस्तीत शिरणार नाही. त्याआधारे संभाव्य धोके टाळता येणे शक्य होईल.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:57 PM 01/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow