गणेश मंडळांना पुढच्या 5 वर्षांच्या मंडप उभारणीसाठी एकदम परवानगी

Aug 2, 2024 - 10:57
 0
गणेश मंडळांना पुढच्या 5 वर्षांच्या मंडप उभारणीसाठी एकदम परवानगी

मुंबई : पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव 2024 सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार गेली दहा वर्षे शासन नियमांचे व कायद्याचे पालन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाच्या गणेशोत्सवापासून सलग पाच वर्षांकरिता विभाग कार्यालयामार्फत एकदाच परवानगी देण्यात येणार आहे.

याकरिता सार्वजनिक अथवा खासगी जागेवर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना मागील दहा वर्षात सर्व नियम कायदे यांचे पालन केले आहे व त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही, असे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार आहे. असे असले तरी दरवर्षी परवानगी नूतनीकरण करणे गरजेचे असेल.

दरम्यान, दिनांक 6 ऑगस्टपासून एक खिडकी योजनेनुसार संगणकीय प्रणालीद्वारे सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी ऑनलाइन परवानगी देण्यात येणार आहे.

मुंबई महानगराची सांस्कृतिक ओळख असणारा श्री गणेशोत्सव दिनांक 7 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने विविध स्तरीय प्रयत्न करित आहे. यंदा महानगरपालिका प्रशासनाने उत्सवादरम्यान विविध स्तुत्य उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून उत्कृष्ट काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना यावर्षीपासून सलग पाच वर्षांसाठी परवानगी देण्यात येणार आहे.

एक खिडकी योजनेद्वारे प्राप्त अर्जांची विभागीय कार्यालयाकडून छानणी करण्यात येईल त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशन व वाहतूक पोलीस विभागाचे 'ना हरकत प्रमाणपत्र' ऑनलाईन पद्धतीने प्राप्त करून संबंधित नियमांनुसार मंडपासाठी परवानगी देण्यात येणार आहे. यंदा नव्यानेच सार्वजनिक उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांसाठी देण्यात येणारी मंडप उभारण्याची परवानगी ही या वर्षासाठीच मर्यादित असेल.

यंदाच्या गणेशोत्सवाचे वेगळेपण म्हणजे बृहन्मुंबई कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी सलग पाच वर्षांकरिता परवानगी देण्यात येणार आहे. तसेच या मंडळांना दरवर्षी या परवानगीचे नूतनीकरण करावे लागणार आहे. या नुतनीकरणात वाहतूक आणि स्थानिक पोलिसांची परवानगी प्राप्त करणे आवश्यक असेल. याशिवाय खासगी जागेवर परवानगी प्राप्त झालेल्या मंडळांना उत्सवापूर्वी विहित कालावधीत जागामालक अथवा सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच वाहतूक पोलीस व स्थानिक पोलीस यांची परवानगी प्राप्त करून घेणे आवश्यक असेल.

सार्वजनिक जागेवरील गणेशोत्सव मंडपाकरता 100 रुपये शुल्क

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सन 2024 च्या उत्सवासाठी अवघे 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर 6 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेपासून संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर > For Citizen > Apply > Pandal (Ganpati/Navratri) या लिंकवर जाऊन दि. ६ ऑगस्ट २०२४ पासून अर्ज सादर करता येईल.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावातच करावे, असे आवाहन उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक श्री. प्रशांत सपकाळे यांनी या निमित्ताने पुन्हा एकदा केले आहे.

1237 मूर्तिकारांकडून मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज

यंदाचा गणेशोत्सव 2024 पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विशेष लक्ष देण्यात आले आहे. यासाठी श्रीगणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तीकारांना मोफत शाडूची माती, मंडपासाठी नि:शुल्क जागा (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार) देण्यात आली आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवासाठी मूर्तीकारांना देण्यात आलेली परवानगी नवरात्रोत्सवापर्यंत कायम राहणार आहे. याशिवाय मूर्तीकारांसाठी एक खिडकी योजना देखील राबविण्यात आली आहे. आतापर्यंत 1237 मूर्तिकारांकडून मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत.

500 टन मोफत शाडू माती वाटप

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी महानगरपालिकेने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत त्याचाच एक भाग म्हणून आतापर्यंत मोफत शाडू मातीसाठी एकूण 217 मूर्तिकारांनी मागणी केली असून, त्यांना आतापर्यंत सुमारे 500 टन मोफत शाडू माती देण्यात आली आहे. यामुळे शाडू मातीपासून तयार केलेल्या श्री गणेश मूर्ती स्थापना करण्याचे प्रमाण यंदा निश्चितच वाढेल, असा विश्वास या निमित्ताने उपायुक्त श्री. सपकाळे यांनी व्यक्त केला आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 02-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow