Kolhapur : पंचगंगा नदी पुन्हा धोक्याकडे..

Aug 3, 2024 - 16:05
 0
Kolhapur : पंचगंगा नदी पुन्हा धोक्याकडे..

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाने पुन्हा जोर पकडला असून, धरणक्षेत्रात धुर्वाधार पाऊस कोसळत आहे. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले असल्याने पंचगंगा नदीच्या पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे.

रात्री आठ वाजता ४२.४ फूट असलेल्या पातळीने आता धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे, त्यात दिवसभरातील पाऊस पाहता कोल्हापूरकरांची धाकधूक पुन्हा वाढली आहे. हवामान विभागाने गुरुवार व शुक्रवार दोन दिवस कोल्हापूरसाठी 'ऑरेंज अलर्ट' दिला होता. त्यानुसार पाऊस सुरू असून, गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी जोर अधिक आहे.

सगळीकडे पुन्हा पाणी पाणी झाले आहे. पुराचे पाणी हळूहळू कमी होऊ लागले होते. मात्र, पावसाचा जोर वाढल्याने ते पुन्हा वाढू लागले आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ५,७८४, वारणातून ११,५५२, तर दूधगंगेतून ९,१०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुराच्या पाण्याची फुग वाढू लागली आहे.

पंचगंगा नदीची पुन्हा धोक्याकडे वाटचाल सुरु असल्याने कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे. दुपारी एकनंतर पुराचे पाणी हळूहळू वाढू लागले आहे. दरम्यान, हवामान विभागाने शनिवारपासून जिल्ह्यात दोन दिवस 'यलो अलर्ट' दिला असला तरी पाऊस अडचणी वाढवण्याची शक्यता आहे.

सरासरी ओलांडली
हातकणंगले, शाहूवाडी, कागल व भुदरगड तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. शिरोळ, पन्हाळा, करवीर, गडहिंग्लजमध्ये वार्षिक सरासरीच्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

पुढच्या पाच दिवसांत २०० मिलिमीटर
सह्याद्री पर्वतरांगांच्या धरण पाणलोट क्षेत्रात पुढच्या पाच दिवसात १५० ते २०० मिलिमीटर पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

हे प्रमुख मार्ग बंद
• कोल्हापूर ते राधानगरी : हळदी येथे पाणी
• निपाणी ते राधानगरी : मुदाळतिटा येथे पाणी
• कोल्हापूर ते मलकापूर: केर्ली येथे पाणी; पण वाठार-कोडोली पर्यायी मार्ग
• इचलकरंजी ते कुरुंदवाड : शिरढोण येथे पाणी
• मलकापूर ते कोकरूड : सरूड येथे पाणी

शुक्रवारचा पाऊस
दिवसभरातील पाऊस : ५५ मिमी
पंचगंगेच्या पातळीत वाढ: दोन इंचाने
सध्याची पातळी : ४२.०४ फूट
बंधारे पाण्याखाली : ७३

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:27 03-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow