Ratnagiri : महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा जाहीर

Aug 6, 2024 - 17:23
 0
Ratnagiri : महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा जाहीर

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा जाहीर झाली असून स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट आहे.शासनाची पु. ल. देशपांडे कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सवच मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात.

स्पर्धेचा अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. संपूर्ण भरलेला अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई-मेल आय. डी. वर पाठवणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज रद्द ठरविण्यात येईल. स्पर्धा निःशुल्क असून सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरिता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे यांविषयी जनजागृकता तसेच जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्ये, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनिप्रदूषणरहित वातावरण, गणेशभक्तांसाठी केलेल्या सोयीसुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच अधिकाधिक समाजाभिमुख उपक्रम घडावेत, म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण केले जाईल. येत्या ७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी स्थापन केलेली जिल्हास्तरीय समिती या स्पर्धेत सहभागी मंडळे किंवा संस्थांच्या उत्सवस्थळाला भेट देतील आणि जिल्हास्तरीय परीक्षण पूर्ण करतील. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे हे ४ जिल्हे प्रत्येकी ३ आणि हे ४ जिल्हे वगळता अन्य ३२ अशा प्रत्येक जिल्ह्यातून एक यानुसार एकूण ४४ शिफारशी राज्यस्तरीय परीक्षणासाठी स्वीकारल्या जातील. 

राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५ लाख, २.५ लाख आणि १ लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी केले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सर्वांनी आपापल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:50 06-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow