वाशिष्ठी दाभोळ खाडीत आढळताहेत मृत मासे

Aug 8, 2024 - 09:52
 0
वाशिष्ठी दाभोळ खाडीत आढळताहेत मृत मासे

लोटे एमआयडीसीतील सीईटीपी व कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी थेट सोडल्याचा संघर्ष समितीचा  आरोप

चिपळूण : कोसळणाऱ्या पावसाचा फायदा घेत वाशिष्ठी दाभोळ खाडीत लोटे औद्योगिक वसाहतीमधील सीईटीपीसह काही कंपन्यांनी नाल्याद्वारे सांडपाणी सोडल्याचा आरोप दाभोळ खाडी परिसर संघर्ष समितीने केला आहे. यामुळे वाशिष्ठी दाभोळ खाडीतील मासे मरू लागले आहेत. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.

गेले दोन-तीन दिवस दाभोळ वाशिष्ठी खाडीमध्ये सातत्याने मेलेले मासे तरंगताना दिसून येत आहेत. अलीकडच्या काही महिन्यांत या खाडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दुर्मीळ मासे मुबलक मिळत असताना, रासायनिक सांडपाणी सोडल्याने आता मासे मृत होऊ लागले आहेत. या बाबत येथील मच्छीमारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यानंतर अधिका-यांनी करंबवणे येथे जाऊन पंचनामा केला आणि पाण्याचे नमुनेदेखील घेतले आहेत. या तक्रारीनुसार, पावसाचा फायदा घेत

सीईटीपीने सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडल्याचा आरोप संघर्ष समितीने केले आहे तर काही कंपन्यांनी आपले सांडपाणी सीईटीपीला न पाठविता थेट नाल्यात सोडल्याची तक्रार केली आहे. या बाबत समितीचे अध्यक्ष संजय जुवळे यांनी, सध्या खाडीतील पाण्यावर तवंग असून पाण्याला उग्र वास येत आहे व वाशिष्ठी दाभोळ खाडीमध्ये ठिकठिकाणी मासे तरंगताना दिसून येत आहेत. या संदर्भात सीईटीपी, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीकडे तक्रार करण्यात आली आहे. या बाबत गांभीयनि दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्यात येईल आणि संतापाचा उद्रेक होईल, असा इशारा जुवळे यांनी दिला आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी
ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल घेत येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी संजय जिरापुरे, क्षेत्र अधिकारी सुशीलकुमार शिंदे यांनी केतकी येथे जाऊन खाडीची पाहणी केली. यावेळी किनाऱ्यालगत अनेक मासे पाण्यात तडफडताना आढळून आले व मृत मासेदेखील सपडले. भोईवाडी जेटीजवळ पाण्याचे नमुने अधिका-यांनी घेतले. याप्रसंगी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष प्रभाकर सैतवडेकर, केतकीचे उपसरपंच रमेश जाधव, खजिनदार विजय जाधव, नीलेश मींडे, नितीन सैतवडेकर, मदन जाधव, कृष्णा जाधव, मुकुंद सैतवडेकर, हृषीकेश मिंडे, विशाखा सैतवडेकर, पंकज जाधव आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 08/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow