रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाण्याला मंजुरी; कोकण रेल्वेची सुरक्षा अधिक मजबूत होणार

Aug 9, 2024 - 14:08
Aug 9, 2024 - 15:23
 0
रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाण्याला मंजुरी; कोकण रेल्वेची सुरक्षा अधिक मजबूत होणार

रत्नागिरी  : कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची सुरक्षा आणि गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी कोकणातील रोहा, कणकवली आणि रत्नागिरी या तीन ठिकाणी लोहमार्ग पोलिस ठाणी प्रस्तावित होती. त्यापैकी रत्नागिरी येथे लोह‌मार्ग पोलिस ठाण्याला शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी ९१ लाख ७० हजारांचा निधी मंजूर करण्यात आला असून १५२ अधिकारी, कर्मचाऱ्यांची प‌दनिर्मिती करण्यात येणार आहे. शासनाच्या गृह विभागाने याबाबतचा अद्यादेश आजच जारी केला. त्यामुळे कोकण रेल्वेची सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हद्दीतील स्थानके, प्रवाशांची सुरक्षा आणि गुन्ह्यांचा तपास करण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांवर आहे. रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा रेल्व सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) अखत्यारित आहे. सध्या लोहमार्ग पोलिसांची हद्द सीएसएमटी ते पनवेल आणि कर्जत, खोपोली, मंकी हिलपर्यंत आहे. रोह्यापासून पुढे कोकण रेल्वेची हद्द सुरू होते. या हद्दीतील सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलावर आहे.

मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाडीत कोकण रेल्वे स्थानकांदरम्यान एखादा गुन्हा घडल्यानंतरही त्याबाबतची तक्रार प्रवासी मुंबईत आल्यानंतर करतात. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल, स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून गुन्हा संबंधित यंत्रणेकडे वर्ग करण्याचे काम लोहमार्ग पोलिसांना करावे लागते. कोकण रेल्वेच्या हद्दीतून प्रवास करताना लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाईनवर महिलांची छेडछाड, विनयभंग किंवा अन्य मारहाणीच्या तक्रारी येतात. मात्र, या हद्दीत लोहमार्ग पोलिस नसल्याने रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधून कारवाई करावी लागते. आपल्या हद्दीतील स्थानके, तसेच प्रवाशांची सुरक्षा व घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करता यावा यासाठी कोकण रेल्वेवरील तीन स्थानकांमध्ये पोलिस ठाणे स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलिस आयुक्त कैसर खालिद यांनी दिली.

महत्त्वाची तीन पोलिस ठाणी
रोहा, रत्नागिरी आणि कणकवली येथे महत्त्वाची तीन पोलिस ठाणी स्थापन करण्याचा येतील आणि या पोलिस ठाण्यांच्या अखत्यारित अन्य स्थानकांचा समावेश करण्यात येईल. त्यासाठी वरिष्ठ दर्जाचे अधिकारी, तसेच कर्मचारी आदी मनुष्यबळही उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत आज गृह विभागाने निर्णय घेतला आहे. तिन्हीपैकी रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाण्याला मंजूर देण्यात आली आहे. पोलिस ठाण्यासाठी हद्द निश्चित करण्याचा प्रस्ताव पोलिस महासंचालकांना तत्काळ पाठवावा, असे अद्यादेशामध्ये म्हटले आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:33 PM 09/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow