बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन

Aug 9, 2024 - 14:43
 0
बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन

◼️ आंदोलक विद्यार्थ्यांचाही मंत्रिमंडळात समावेश

ढाका : बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचार सुरू होता. ही परिस्थिती अखेर नियंत्रणाबाहेर गेल्यामुळं शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत बांगलादेशातून पळ काढला आहे.

यानंतर आता परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे. या सरकारचे अंतरिम नेतृत्व नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस करत आहेत.

मोहम्मद युनूस यांनी गुरुवारी (८ ऑगस्ट) पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोहम्मद युनूस यांच्यासोबत आणखी १६ सदस्यांनीही शपथ घेतली आहे, ज्यामध्ये ४ महिलांचाही समावेश आहे. ढाका येथील राष्ट्रपतींचे निवासस्थान बंगभवन येथे हा शपथविधी सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच दोन २६ वर्षांच्या विद्यार्थ्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये शेख हसीना यांच्या विरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी नेते नाहिद इस्लाम आणि आसिफ मेहमूद यांचा समावेश आहे. या दोघांनी देशभरात झालेल्या आरक्षणविरोधी आंदोलनाचं नेतृत्त्व केलेलं आहे.

मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्त्वाखाली नाहिद इस्लाम, आसिफ मेहमूद, रिजवाना हसन, फरीदा अख्तर, आदिल-उर-रहमान खान, एएफएम खालिद हुसैन, नूरजहाँ बेगम, शर्मीन मुर्शिद, फारुख-ए-आझम, सालेहुद्दीन अहमद, प्राध्यापक आसिफ नजरुल, हसन आरिफ, ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) एम सखावत हुसैन, सुप्रदीप चकमा, प्राध्यापक बिधान रंजन रॉय, तौहीद हुसेन यांचा मंत्रिमंडळात समावेश आहे. मोहम्मद युनूस यांचं अंतरिम सरकार संकटग्रस्त बांगलादेशाचं नेतृत्त्व करेल. तसंच लोकनियुक्त सरकार सत्तेवर येईपर्यंत त्यांच्याकडे देशाची जबाबादारी असणार आहे.

मोहम्मद युनूस यांच्याविषयी...
मोहम्मद युनूस यांचा जन्म २८ जून १९४० रोजी झाला. ते बांगलादेशातील नामवंत उद्योगपती, बँकर आणि अर्थतज्ञ आहेत. मोहम्मद युनूस यांना जगभरात 'गरिबांचा बँकर' या नावानं ओळखलं जातं. मोहम्मद युनूस यांच्या ग्रामीण बँकेच्या स्थापनेमुळे बांगलादेश व नंतर जगभरातील गरिबांना कर्जाची सुविधा उपलब्ध झाली. विशेष म्हणजे या सुविधेच्या बहुतांश लाभार्थी या महिला होत्या. ग्रामीण बँकेची स्थापना करून सूक्ष्म पातळीवर कर्ज आणि अर्थपुरवठा याबाबत त्यांनी केलेल्या कार्याबद्दल २००६ मध्ये त्यांचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.

बांगलादेश बँकेच्या सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे राजीनामे
बांगलादेश बँकेचे डेप्युटी गव्हर्नर काझी सय्यदुर रहमान यांच्यासह सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी राजीनामे दिले आहेत. बांगलादेश बँकेचे गव्हर्नर व काही डेप्युटी गव्हर्नर हे बँकेचे नुकसान करणाऱ्यांनाच मदत करत आहेत, असा आरोप तेथील अधिकाऱ्यांनी केला होता. त्यांनी गव्हर्नरच्या कार्यालयावर मोर्चाही काढला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:10 09-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow