बारसू-नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही सुरु

Aug 10, 2024 - 09:42
Aug 10, 2024 - 09:58
 0
बारसू-नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही सुरु
◼️ नाणारमधील बॉक्साईट संदर्भातील सुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित; पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश
रत्नागिरी : नाणार येथे बॉक्साईट संदर्भात केंद्र शासनाने निर्देश दिल्यानुसार होणाऱ्या सुनावणीबाबत प्रांताधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देवून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थिती पाहून वस्तुनिष्ठ अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा अशा सूचना देतानाच ही सुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारच्या बैठकीत दिले. बारसू आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत कार्यवाहीदेखील सुरु करण्याची सूचना त्यांनी केली.
  
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज पालकमंत्री श्री. सामंत यांनी विविध विषयांबाबत बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.  
      
राजापूर तालुक्यातील पांगरी खुर्द नळपाणी योजना तसेच पुनर्वसन विषयाबाबत पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, स्वच्छ आणि मुबलक पाणी ग्रामस्थांना मिळण्यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाटबंधारे यांनी एकत्रितरित्या ग्रामस्थांसोबत बैठक घेवून, ग्रामस्थांचा विषय तात्काळ मार्गी लावावा. प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी पाहणी करुन जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव द्यावा.  25 लाखांचे अंदाजपत्रक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने बनवावे.  जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात बैठक घ्यावी.   
   
गडनदी प्रकल्पाबाबतही ग्रामस्थांची बैठक घ्यावी. ज्या ग्रामपंचायत हद्दीत प्रकल्प झाले आहेत त्याची यादी प्रसिध्द करावी.  खेडशेत ग्रामस्थांना आरोग्य उपकेंद्र दिले जाईल. पाचल गावाच्या आठवडी बाजारासाठी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी 25 लाख रुपये देण्याबाबत कार्यवाही करावी.  त्याचबरोबर ग्रामस्थांच्या रस्त्यांबाबतची मागणी पाटबंधारे विभागाने सोडवावी. आरजीपीबीएल नावाने दाभोळ वीज प्रकल्प सुरु आहे.  2019 पासून कर्मचाऱ्यांची थांबविलेली पगारवाढ कंपनीने तात्काळ द्यावी.  सहायक आयुक्त कामगार, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कामगारांची जी थकबाकी द्यावी लागते त्याबाबत तात्काळ तोडगा काढून थकबाकी अदा करावी.  
  
जेएसडब्ल्यू, फिनोलेक्स याबाबतही पालकमंत्र्यांनी बैठक घेतली ते म्हणाले, ज्यांच्या जमिनीवर प्रकल्प उभे केले,  ज्यांच्या जीवावर एसीमध्ये बसतो, गाड्यातून फिरतो त्या स्थानिकांना सेवेत सामावून घ्यावे. वेतनवाढीचे प्रश्न सोडवावेत, कोणाचीही नोकरी जाणार नाही याची दक्षता घ्यावी.  त्याचबरोबर त्यांच्या वेतनवाढीचाही निर्णय घ्यावा, असेही पालकमंत्र्यांनी सूचना केली.  
    
नाणार आणि परिसरातील ग्रामस्थांच्या शिष्ठमंडळासोबतही आज बैठक झाली यावेळी पालकमंत्री श्री सामंत म्हणाले,  बॉक्साईट संदर्भात होणारी सुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित ठेवा.  प्रातांधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देवून वस्तुस्थितीची पाहणी करुन अहवाल सादर करावा.  त्याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांनी अहवाल तयार करुन केंद्र शासनाकडे पाठवावा.  राज्य शासनाने 31 जुलै 2024 रोजी शासन निर्णय प्रसिध्द केला आहे यानुसार बारसू आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही करावी असेही ते म्हणाले.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 10-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow