येत्या शनिवारी 'लाडकी बहीण'चे 3 हजार खात्यात ! कोणाच्या खात्यात येणार पैसे? कोण पात्र, कोण अपात्र? जाणून घ्या

Aug 13, 2024 - 12:29
 0
येत्या शनिवारी 'लाडकी बहीण'चे 3 हजार खात्यात ! कोणाच्या खात्यात येणार पैसे? कोण पात्र, कोण अपात्र? जाणून घ्या

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra :) पहिला हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकार मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे. पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये येत्या शनिवारी 17 ऑगस्टला भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पैसे वितरित करण्याचा मोठा कार्यक्रम होणार आहे. त्याआधी राज्य मंत्रिमंडळाची आज अकरा वाजता मंत्रालयात बैठक होत आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांची अतिशय महत्त्वाची समजणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सादरीकरण होईल. या योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला वितरित करणार आहे . त्यासाठी राज्य सरकार मोठा कार्यक्रम आयोजित करत आहे तो कार्यक्रम संदर्भात आज निर्णय होणार आहे.

पुण्यात जंगी कार्यक्रमाचं आयोजन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनापूर्वी वितरीत केला जाणार आहे. त्यापूर्वी शिंदे-फडणवीस-अजित पवार यांचं महायुतीचं सरकार मोठं शक्तीप्रदर्शन करणार आहे. पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये शनिवारी भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थिती राहणार आहेत. इतकंच नाही तर या कार्यक्रमासाठी प्रत्येक जिल्ह्यातून पालकमंत्रीही सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमातून एका क्लिकवरती कमीत कमी एक कोटीहून अधिक महिलांना प्रत्येकी तीन हजार रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता या योजनेच्या माध्यमातून सरकारचं मोठं शक्ती प्रदर्शन असेल.

कोणाच्या खात्यात येणार पैसे? कोण पात्र, कोण अपात्र?

महाराष्ट्रातील सरकारने महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. ज्या महिलांनी नारी शक्ती दूत हे अॅप किंवा वेबसाईटवरुन अर्ज भरले आहेत आणि ज्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत, त्यांना या योजनेचे पैसे मिळणार आहेत. या योजनेसाठी राज्यभरातून कोट्यवधि महिलांनी अर्ज केला आहे. या सर्व अर्जांची छाननी युद्धपातळीवर सुरु आहे. या छाननीमध्ये काही महिलांचे अर्ज बाद ठरत आहेत. तर काही महिलांचे अर्ज पेंडिंग, अप्रूड असे दाखवत आहेत. ज्या महिलांनी अर्ज केल्यानंतर त्यांच्या अर्जासमोर अप्रूड (Approved) असा पर्याय दिसत असेल, त्याच महिलांच्या खात्यात येत्या शनिवारी 17 ऑगस्टला 3 हजार रुपये जमा होणार आहेत.

महिलांसाठी स्वतंत्र बँक अकाऊंटची अट का?

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांसाठी स्वतंत्र बँक अकाऊंटची अट ठेवली आहे. ती अट नेमकी का ठेवण्यात आली आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याबाबत राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी राबवली जाणार आहे. कुटुंबाच्या गरजा भागवताना महिलांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात. त्या इच्छा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पूर्ण होणार आहेत. या पैशांवर फक्त महिलांचाच अधिकार असावा म्हणून महिलांचे स्वतंत्र बँक खाते ही अट ठेवली असे तटकरे म्हणाल्या. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शहापूर येथे महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या.

माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे 17 ऑगस्टला संबंधित लाभार्थी महिलेच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत. गरजू महिलांना हक्काचे पैसे मिळावेत हाच हेतू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तयार करताना डोळ्यासमोर होता असे तटकरे म्हणाल्या. ज्या महिलांनी बँक खाते काढले नसेल त्यांनी तात्काळ बँक खाते काढून 31 ऑगस्ट पूर्वी मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरावा असं आवाहन देखील आदिती तटकरे यांनी केलं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 13-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow