कोकणात 'आई' पर्यटन धोरणाची आखणी

Aug 13, 2024 - 17:27
 0
कोकणात 'आई' पर्यटन धोरणाची आखणी

रत्नागिरी : होम स्टे, हॉटेल रेस्टॉरंट आणि इतर व्यवसायात तसेच पर्यटन क्षेत्रांमध्ये महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेता शासानाने यंदा विविध सवलती देणारे 'आई' महिला केंद्रित पर्यटन धोरण आखले आहे. याचा फायदा जिल्ह्यातील महिला पर्यटन व्यावसायिकांना होणारा असून, पर्यटन क्षेत्रात नव्या उद्योजिका तयार होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून 'आई' हे धोरण जाहीर करण्यात आले असून, महिला उद्योजकता विकास, महिलांकरिता पायाभूत सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य, महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने, सवलती, प्रवास आणि पर्यटन विकास या उद्देशाने ही योजना राबविण्यात येणार आहे.

धोरणांतर्गत महिला करीत असलेला व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असला पाहिजे, महिलांच्या नावे असलेल्या हॉटेल, रेस्टॉरंट्समध्ये ५० टक्के व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक राहील. महिलांच्या मालकीच्या टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये ५० टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक राहील. पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात, कर्जाचे हप्ते वेळेत भरणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालमत्तांच्या ठिकाणी, बचतगटांना हस्तकला, कलाकृती, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी स्टॉल, जागा उपलब्ध करणार आहे. याचा फायदा महिलांना होणार आहे. प्रत्येक तालुक्यात पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीचे व त्यांनी चालवलेल्या हॉटेल, होम स्टे, टूर व ट्रॅव्हल कंपनी इ. दहा पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी महिलांनी मान्यताप्राप्त बँकांमार्फत घेतलेल्या १५ लाख रुपयांपर्यंत कर्जाच्या रकमेवरील व्याजाची रक्कम १२ टक्केच्या मयदित परतफेड केली जाणार आहे. याकरिता पर्यटन संचालनालयामध्ये महिला पर्यटन धोरण कक्ष तयार करण्यात येणार आहे.

महिलांसाठी नवी संधी
रत्नागिरी जिल्ह्यात वर्षभर लाखोंच्या संख्येने पर्यटक भेट देतात. गणपतीपुळे, दापोली, गुहागर, वेळणेश्वर, राजापूर, आदी किनारी पर्यटनस्थळावर विकेंडला येणाऱ्या पर्यटकांची गर्दी मोठी असते. तसेच सध्या कृषी पर्यटनही जिल्ह्यात जम धरत आहे. या भागातही पर्यटन व्यवसाय वाढू लागला आहे. अनेक महिला क्षेत्राशी निगडित असून, लहान मोठा व्यवसाय करू लागल्या आहेत. त्यामुळे आई धोरणांतर्गत पर्यटनात आता महिलांना नवीन संधी प्राप्त झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:55 13-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow