सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेतर्फे गृहनिर्माण, पतसंस्थांवर चर्चासत्र

Aug 21, 2024 - 14:19
 0
सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेतर्फे गृहनिर्माण, पतसंस्थांवर चर्चासत्र

रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूच्या येथील शाखेतर्फे हॉटेल विवेक येथे रेरा आणि को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, को-ऑपरेटिव्ह पतसंस्था याविषयी चर्चासत्र पार पडले. यासाठी प्रमुख वक्ते म्हणून मुंबईतील को-ऑपरेटिव्ह आणि रियल इस्टेटमध्ये काम पाहणारे ज्येष्ठ सीए रमेश प्रभू, सीए शिल्पा शिनगारे व कोल्हापूर येथील सीए सुनील नागावकर यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रास्ताविकात शाखेच्या अध्यक्षा सीए अभिलाषा मुळ्ये यांनी चर्चासत्राचे उद्दिष्ट स्पष्ट केले. सीएने फक्त इन्कम टॅक्स, जीएसटी आणि ऑडिट यात अडकून न पडता अर्थव्यवस्थेची गरज असलेल्या को-ऑपरेटिव्ह, रेरा या क्षेत्रांकडे पण सकारात्मक दृष्टीने बघितले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

प्रथम सत्रात सीए रमेश प्रभू यांनी रेरा अॅक्ट कसा अस्तित्वात आला, याची पार्श्वभूमी सांगत सीए रियल इस्टेट क्षेत्रात कसे योगदान करता येते, याविषयी मार्गदर्शन केले. को-ऑपरेटिव्ह क्षेत्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेत सीएंचे ग्रामीण, निमशहरी अर्थव्यवस्थांमध्ये असलेले महत्त्व विशद केले.

द्वितीय सत्रात सीए सुनील नागावकर यांनी भारतातील को-ऑपरेटिव्ह बँकिंग, पतसंस्था यामध्ये होणाऱ्या व्यवहारांमध्ये एकट्या महाराष्ट्राचे प्रमाण ५० टक्के असल्याचे सांगितले. को-ऑपरेटिव्ह बँक तसेच पतसंस्था यांविषयी नवीन धोरणे आणि ऑडिटर म्हणून सीएंची जबाबदारी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

तिसऱ्या सत्रात सीए शिल्पा शिनगारे यांनी चार्टर्ड अकाउंटंट हे फक्त ऑडिटर म्हणून भूमिका न बजावता को- ऑपरेटिव्ह क्षेत्रात एक सल्लागार म्हणून आपल्या ज्ञानाचा उपयोग करत कशा प्रकारे काम करून शकतात, याविषयी मार्गदर्शन केले.

चर्चासत्रातील तीन सत्रांसाठी अध्यक्ष म्हणून सीए भूषण मुळ्ये, सीए चिंतामणी काळे व सीए अभिलाषा मुळ्ये यांनी काम पाहिले. सीए मीनल काळे यांनी सूत्रसंचालन केले. शाखेचे कोषाध्यक्ष सीए अक्षय जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सीए शाखेचे उपाध्यक्ष सीए शैलेश हळबे, सचिव सीए केदार करंबेळकर, कोषाध्यक्ष आणि पश्चिम भारत सीए विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सीए अक्षय जोशी, समिती सदस्य सीए प्रसाद आचरेकर, माजी अध्यक्ष सीए बिपीन शाह यांच्यासह रत्नागिरीतील सीए उपस्थित होते.
                 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:46 21-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow