दापोली : रजिस्टर्ड लग्न केल्याने जातपंचायतीने मुस्लीम कुटुंबाला टाकले वाळीत

Aug 26, 2024 - 11:46
 0
दापोली : रजिस्टर्ड लग्न केल्याने जातपंचायतीने मुस्लीम कुटुंबाला टाकले वाळीत

दापोली : पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी एक घटना दापोलीत घडली आहे. एका तरुणीने नोंदणी पद्धतीने विवाह केल्याने जातपंचायतीकडून कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले आहे. पीडित कुटुंबाने या जातपंचायतीच्या विरोधात दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र, या घटनेमुळे जातपंचायतीची पाळेमुळे अजूनही शिल्लक असल्याचे समोर आले आहे.

अडखळ इरफानिया मोहल्ला येथील रहिवासी जावेद पटेल यांच्या मुलीने रितीरिवाजाला बगल देत मर्जीप्रमाणे केळशी गावातील मुस्लीम तरुणाशी रजिस्टर्ड मॅरेज केले होते. त्यामुळे पटेल कुटुंबीयांवर जातपंचायतीने सामाजिक बहिष्कार घालत २ वर्षे वाळीत ठेवण्याचा निर्णय घेतला. हे कुटुंबीय गेले ८ महिने वाळीत असल्याची धक्कादायक माहिती पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीतून समोर आली आहे. मुलीशी दोन वर्षे कोणतेही संबंध ठेवू नये तसेच मुलीला माहेरी येण्यास मज्जाव करावा किंवा ३० हजार रुपये दंड भरल्यास समाजात घेतले जाईल, असा पवित्रा मुस्लिम समाजाच्या जातपंचायतीने घेतला असल्याची फिर्याद दापोली पोलीस ठाण्यात जावेद पटेल, जुलेखा पटेल यांनी दिली आहे. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात आजही अनेक कुटुंबाला जातपंचायतीचे चटके बसत आहेत. जातपंचायतीवर शासनाने कायद्याने बंदी घातली आहे. मात्र, अनेक समाजातील जातपंचायतीचा पगडा असल्याचे पाहायला मिळत आहे. जात पंचायतीचे जाचक चटके सहन करत जीवन जगण्याची वेळ अडखळ गावातील पटेल कुटुंबावर आली आहे. गावातील अनेक तरुणांनी समाजाच्या रितीरिवाजाला बगल देत लग्न केले आहे. एका तरुणाने तर चक्क पाकिस्तानातील तरुणीशी विवाह केला आहे. अशा कोणत्याही लोकांना जात पंचायतीने दंड घेतला नाही. मात्र, याच कुटुंबाला दंड किंवा वाळीत का टाकण्यात आले, असा प्रश्न या गावातील सामाजिक कार्यकर्ते मुज्जम्मील जैतापकर यांनी उपस्थित केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 26/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow