कोकण किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा

Aug 27, 2024 - 09:54
Aug 27, 2024 - 09:59
 0
कोकण किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा

रत्नागिरी : कोकण किनारपट्टी भागात शनिवार, रविवार सलग दोन दिवस जोरदार सातत्य राखल्यानंतर सोमवारीही पावसाची दमदार हजेरी लावली. जवळपास सात दिवसांचा खंड घेतल्यानंतर पावसाने रत्नागिरीसह कोकणातील सर्व जिल्ह्यांत सक्रियता दाखवली आहे. पुढील ७२ तासात पावसाचा जोर वाढणार असून, त्याला वाऱ्याचीही प्रभावी साथ लाभणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबर ठाणे, पालघर जिल्ह्यांत देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला होता. परिणामी, कोकण किनारपट्टी भागात उकाडा वाढला होता. मात्र, त्यानंतर सक्रिय झालेल्या पावसाने शनिवारी आणि रविवारीही जोर धरला. जोरदार पावसाने हवेत गारठा वाढला. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसह शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला.

रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी संपलेल्या २४ तासांत ६७ मि.मी.च्या सरासरीने तब्बल ६०३ मि.मी. एकूण पाऊस झाला. रविवारीही पावसाने ९७ मि.मी.च्या सातत्याने दमदार सक्रिता दाखविली होती.

गेल्या दोन दिवसात रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यात प्रत्येकी तबब्ल २०० मि.मी. एकूण पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत म्हणजे १ जून पासून साडेतीन हजाराची निर्धारीत सरासरी पार केली आहे. १०४ टक्के पावसाने मजल मारली आहे. गतवर्षाच्या तुलनेत पावसाच्या पहिल्या तीन महिन्यांतच सरासरी ओलांडली आहे. गेल्यावर्षीया कालावधीत ७१ टक्यावर पाऊस रेंगाळला होता. रत्नागिरी जिल्ह्यात आर्तापर्यंत सर्वाधिक पाऊस मंडणगड तालुक्यात (३७४१ मि.मी.) झाला आहे. तर सर्वात कमी पाऊस गुहागर तालुक्यात (२९९८ मि.मी.) नोंदविला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३९हजार ६३७ मि.मी.ची एकूण मजल गाठली आहे.

पावसाच्या दमदार सातत्यामुळे खरीप लागवड क्षेत्रात शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. भात रोपांच्या वाढीसाठी अनुकूल पाऊस असल्याचा दिलासा शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यातील शेतकऱ्यांची चिंता आता दूर झाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. मात्र भात खाचरात पाण्याचा निचरा होण्याची खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. दरम्यान, सोमवारी जन्माष्टमीला जोर धरलेला पाऊस मंगळवारी गोपाळकाल्याच्या दिवशीही हजेरी लावण्याची अपेक्षा असल्याने दहिकाला मंडळाच्या कार्यकत्यांमध्ये उत्साह आहे.

प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा...
दरम्यान हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस कोकणातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. कोकणात व घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीचा हवामान विभागाचा अंदाज आहे. या कालावधित वाऱ्याचा वेग ताशी ठीस ते ३५ कि.मी. वेगाने राहणार आहे. त्या प्रभवाने पावसाचा जोरही वाढणार आहे. त्यामुळे किनारी भागासह मच्छिमारांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 27/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow