राजापूर आगाराच्या बसचालकाची गळफास घेत आत्महत्या

Aug 29, 2024 - 10:29
 0
राजापूर आगाराच्या बसचालकाची गळफास घेत आत्महत्या

राजापूर : राजापूर आगाराच्या कुंभवडे वस्ती एसटी बस चालकाने कुंभवडे ग्रामपंचायत शेजारी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एसटी चालक अनिल शिवाजी दिवसे (41) मुळगाव नागदेववाडी ता. करवीर जि. कोल्हापूर आणि वाहक सुभाष धोंडीराम मनगुडे (रा. राधानगरी कोल्हापूर राजापूर एसटी आगाराची कुंभवडे) वस्तीची गाडी घेऊन गेलेले होते. कुंभवडे ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारी एका रूम मध्ये चालक वाहकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

या ठिकाणी रात्री आठ साडेआठच्या सुमारास चालक दिवसे फोनवर बाहेरच्या बाजूला बोलत होते आणि वाहक रूममध्ये होते. रात्री नऊ आणि साडेनऊच्या सुमारास जेवणाची वेळ झाली म्हणून वाहक आणि दोन-तीन वेळा त्यांना फोन केला मात्र त्यांचा फोन कायम बिझी लागत होता. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास पुन्हा एकदा फोन लावला. फोन दरवाज्याजवळच वाजत असल्याचे निदर्शनास आल्याने वाहक बाहेर बघायला गेले मात्र त्यावेळी दरवाज्याला बाहेरून कडी लावल्याचे त्यांच्या लक्षात आले. तो दरवाजा हलवून हलवून त्यांनी उघडल्यानंतर बाहेरच्या बाजूला लोखंडी ग्रीलला दिवसे गळफास लावलेले स्थितीत आढळून आले. घाबरलेल्या वाहक आणि तत्काळ आपल्या अधिकाऱ्यांना कळविले. अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती दिली. रात्री बाराच्या सुमारास सागरी पोलीस ठाणे नाटेचे कर्मचारी आणि राजापूर आगाराचे अधिकारी दाखल झाले. कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ओणी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठविण्यात आला. तर आज 28 ऑगस्टला मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मात्र या वाहक चालकाने आत्महत्या का केली याविषयी अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

एवढा वेळ तो चालक कोणाशी फोनवर बोलत होता. त्याच्यामध्ये काय संभाषण झाले हे तपासातून निष्पन्न होऊन नक्की त्या चालकाने आत्महत्या का केली याचा लवकरच उलगडा झाला पाहिजे, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.

सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल बागुल अधिक तपास करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 29-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow