सावर्डे खून प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Aug 30, 2024 - 10:09
 0
सावर्डे खून प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या

चिपळूण : सावर्डे येथील नांदगाव खुर्द गोसावीवाडी येथील एका 65 वर्षीय महिलेच्या डोक्यात सिलेंडर घालून तिची हत्या केल्याची घटना मंगळवारी घडली होती. पोलिसांनी वेगाने तपास करत 24 तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

विशेष म्हणजे घटनास्थळी सापडलेल्या ब्लूटूथवरुन पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला. हा खून आरोपीने कशासाठी केला याबाबतचा तपास पोलीस करत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

दहीहंडीच्या दिवशी संध्याकाळी गोसावीवाडीमध्ये सदर घटना घडली. वयोवृद्ध सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी परशुराम पवार आणि त्यांच्या पत्नी सुनीता पवार हे दोघे घरात रहात होते. त्यांचा मुलगा मुंबईमध्ये राहत असून पोलीस दलात कार्यरत आहे. दहीहंडीच्या दिवशी परशुराम पवार हे घराबाहेर गेले होते. मात्र सायंकाळी घरात आले त्यावेळी त्यांना घरात अंधार दिसला. त्यांनी लाईट लावून पाहीले तर त्यांची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यांनी तत्काळ पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलेंडर डोक्यात घालून सुनीता पवार यांचा खून करण्यात आला होता. तसेच त्यांच्या अंगावरील साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र आणि हातातील बांगड्या लंपास केल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी शोध घेतला असता त्यांना ब्लूटूथ सापडले. त्या ब्लूटूथवरुन आरोपी शेजारीच असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी स्वप्नील खातू याला ताब्यात घेतले. स्वप्नील खातू हा बेस्टमध्ये लिपीक पदावर कार्यरत आहे. त्याकरीता तो मुंबईतून गावी आला होता. हा खून खातूने कोणत्या उद्देशाने केला याचा तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 30-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow