रत्नागिरीत हिंदू समाजाचा निषेध मोर्चा

Aug 30, 2024 - 12:15
 0
रत्नागिरीत हिंदू समाजाचा निषेध मोर्चा

रत्नागिरी : हिंदू-हिंदू भाई भाई, बांग्लादेशी हिंदूंच्या समर्थनार्थ रत्नागिरीतील हिंदू मैदानात, बांग्लादेशी, रोहिंग्या मुसलमान हटवा असे नारे देत रत्नागिरीतील जागृत हिंदू समाजाने मोर्चा काढला. मारुती मंदिर ते जयस्तंभापर्यंत हिंदूंनी एकी दाखवली. जयस्तंभ येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना रत्नागिरीमध्ये अमली पदार्थांचे वाढते प्रमाणे, महिलांवरील अत्याचार, विविध भागांमध्ये सीसी टीव्ही अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या सर्व मागण्या केंद्र सरकारकडे पाठवू आणि योग्य ती भूमिका घेतली जाईल, अशी ग्वाही दिली.

काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून मोर्चाला पाठिंबा दर्शवला. हिंदू समाजाविरुद्ध होत असलेल्या अत्याचारी घटना आणि बिघडलेली कायदा- सुव्यवस्था याबाबत तीव्र निषेध आणि सुधारणेसाठी आज मोर्चा काढण्यात आला. मारुती मंदिर येथून मोर्चाला सुरवात करण्यात आली. या वेळी भगवे झेंडे घेऊन आणि हातामध्ये निषेधाचे विविध फलक घेऊन हिंदू महिला भगिनी, बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बांग्लादेशात हिंदुवर होणारे अत्याचार, गो मांस तस्करी, अंमली पदार्थांमुळे तरुण पिढी, महिलांवर होणारे अत्याचार याबाबत हिंदू समाजाने आज निषेध मोर्चा काढला. मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. रत्नागिरीमध्ये चार दिवसांपूर्वी घडलेल्या युवती अत्याचार प्रकरणाचा तपास त्वरित करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चाचे रूपांतर सभेत झाल्यानंतर संजय जोशी, चंद्रकांत राऊळ, राकेश नलावडे आणि तनया शिवलकर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली. या वेळी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हेसुद्धा उपस्थित होते. जागृत हिंदू समाजाच्या वतीने शिष्टमंडळाने निवेदन दिले.

जागृत हिंदू समाजातर्फे विधायक, धार्मिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक संघटना, संस्था एकत्र आल्या. या संस्था प्रगत आणि सुसंस्कृत अशा अखंड हिंदुस्थानच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील आहेत. जगभर साम्राज्यवादी, जिहादी आणि इस्लामिक कट्टरतावादी शक्तींनी धुमाकुळ घालून सामान्य शांतताप्रिय नागरीकांचे जगणे मुश्कील केले आहे. यामुळेच बांगलादेशात निरपराध हिंदू समाजाला लक्ष्य करून हत्या, महिलांवर अत्याचार करण्यात आले. या सर्वाचा जागृत हिंदू समाज म्हणून तीव्र शब्दात निषेध नोंदवत असून भारत सरकारने या हिंदू बांधवांच्या संरक्षणासाठी कठोर पावले उचलावीत, असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

देशात विविध भागांत बांग्लादेशी आणि रोहिंग्या मुसलमान असून त्याचा सखोल तपास करुन त्यांना त्वरीत या देशातून हाकलून लावावे, अशी मागणी करण्यात आली. रत्नागिरीमध्ये अंमली पदार्थांची तस्करी मोठया प्रमाणात वाढली आहे. जिथून हे पदार्थ येत आहेत तिथेच अटकाव केला पाहिजे. अनेक भागांत सीसी टीव्ही नसल्याने गुन्हेगारांना पकडता येत नाही. त्यामुळे सीसी टीव्ही चालू करावेत. रत्नागिरीमध्ये महिलांवर अत्याचार, लव्ह जिहादच्या घटना, अनधिकृत बांधकामे, गोमांस तस्करी, लॅण्ड, व्यापार आणि हलाल जिहादचे तसेच सक्तीच्या धर्मांतराचे षड्यंत्र राबवले जात आहे. त्यामुळे प्रशासन हिंदूंच्या सुरक्षेची कोणती विशेष उपाययोजना करत आहे याची माहिती मिळण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

उरण येथील दाऊद शेखने केलेली यशश्री शिंदे या हिंदू तरुणीची निर्घृण हत्या, बजरंग दल कार्यकर्ता अरविंद वैश्य याची हत्या, बदलापूर येथील अत्याचाराची घटना, विशाळगडावरील तसेच अन्य किल्ल्यांवरील इस्लामी अतिक्रमणे, रत्नागिरीत नुकतीच झालेली हिंदू तरुणीवरील अत्याचाराची घटना यासह जिल्ह्यातील गो तस्करी, सीआरझेड उल्लंघन, मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांचा त्रास, अनधिकृत मदरसे, वंदे मातरमचा विरोध तसेच धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण करणारे घडलेले गंभीर गुन्हे याबाबत जागृत नागरीकांकडून वारंवार तक्रारी करुनही येथील प्रशासनाने त्याची योग्य दखल न घेतल्याने आम्ही हिंदू व्यथित झालो आहोत. अनेक गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना तपासातील त्रुटींमुळे लगेच जामिन मिळाल्याने प्रशासनानेच अशा गुन्हेगारांना सहाय्य करण्याचे ठरवले आहे की काय? अशी शंका रत्नागिरीमधील हिंदू समाजाच्या मनात येऊ लागली आहे. हिंदूंना वाचविण्यासाठी आता कोणी वाली उरला नसल्याची भावना जोर धरत आहे. येथील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा अनेक महिने बंद असलेचे निदर्शनास आलयाने हिंदूंमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे.

वरील गंभीर गुन्हयांच्या पार्श्वभूमिवर सर्वसामान्य हिंदू समाजाच्या सुरक्षेची तातडीने उपाययोजना करावी. बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेची विनंती केंद्र सरकार पर्यंत पोहोचवावी. जिल्ह्यातील बांगलादेशी व रोहिंग्यांची तपासणी मोहीम त्वरीत हाती घेऊन कारवाई करावी. गंभीर गुन्हयांचा सखोल तपास करण्याचे निर्देश तपास यंत्रणांना देऊन दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारून सर्व कायद्यांची योग्य अंमलबजावणी करुन हिंदूवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 30-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow