मुंबई-गोवा महामार्गाचे निकृष्ट काम भोवले

Sep 2, 2024 - 13:43
 0
मुंबई-गोवा महामार्गाचे निकृष्ट काम भोवले

खेड : मुंबई-गोवा महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा ठपका ठेवत, ठेकाधारक चेतक एंटरप्रायझेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हुकमीचंद जैन यांच्यासह व्यवस्थापक प्रकल्प समन्वयक व प्रकल्पावर काम करणाऱ्या इतर जबाबदार व्यक्तींविरोधात रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलिस स्थानकात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद काबळे यांना अटक करण्यात आली आहे. या बाबत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अभियंत्यांनी तक्रार दाखल केली आहे.

माणगाव हद्दीतील इंदापूर ते वडपाले या २६.७ कि. मी. अंतराच्या महामार्गाचे काम चेतक एंटरप्रायझेस लिमिटेड व पको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीमार्फत सुरू होते. या कामासाठी २ वर्षांची मुदत देण्यात आली होती. कालावधी संपुष्टात आल्यानंतर मुदतवाढ देऊनही ठेकेदारांनी महामार्गाचे काम पूर्ण न केल्याने महामार्ग प्राधिकरणाकडून तीनवेळा कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आल्या होत्या. मात्र तरीदेखील कंत्राटदारांनी संथगतीने कामे करत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणतीच खबरदारी घेतली नव्हती. 

यामुळे महामार्गावर १७० अपघात घडले असून ९७ प्रवाशांना प्राणास मुकावे लागले आहे, तर २०८ प्रवाशांना गंभीर व किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत. महामार्गाचे कामही रखडल्याने प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठवडाभरापूर्वीच महामार्गाचा पाहणी दौरा करत महामार्गाच्या कामात निष्काळजीपणा दाखवणाऱ्यांसह काम अर्धवट सोडून पळ काढणाऱ्या कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

आदेशानुसार कंपनीचे व्यवस्थापकीय आदर संचालक हुकमीचंद जैन, जनरल व्यवस्थापक अवधेशकुमार सिंह, प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे, प्रकल्पावर काम करणाऱ्या कंपनीच्या इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित कावळे यांना अटकही करण्यात आली आहे. या बाबतचा अधिक तपास रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बेलदार करत आहेत.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 02/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow