"एकनाथ खडसे आमच्यासोबत राहतील", चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास

Sep 2, 2024 - 16:33
Sep 2, 2024 - 16:36
 0
"एकनाथ खडसे आमच्यासोबत राहतील", चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : गेल्या काही महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती.

तसेच, जळगाव लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार केला होता. मात्र, अद्याप एकनाथ खडसे हे भाजपमध्ये सामील झाले नाहीत.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावमध्ये बॅनर झळकले. या बॅनरवर शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे कोणत्या पक्षात आहेत? असा प्रश्न उपस्थित झाला. यावर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. भाजपमध्ये माझा प्रवेश झाला, पण घोषणा झालेली नाही. काही दिवस वाट पाहीन आणि राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होईन, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. एकनाथ खडसे यांच्या या विधानानंतर आता भाजपनेही याबाबत भाष्य केलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. "एकनाथ खडसे काय म्हणाले, ते माहिती नाही. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचे आयुष्य मंगलमय होवो. लोकसभा निवडणुकीत त्यांनी रक्षाताई खडसे यांना निवडून आणण्यासाठी आम्हाला मदत केली. ते पुढेही तशी मदत करतील. ते आमच्यासोबत राहतील हा विश्वास आहे", असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ खडसे भाजपसोबतच राहतील, असा विश्वास व्यक्त केला. मात्र, त्यांच्या पक्षप्रवेशाची अद्याप कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही.

काय म्हणाले एकनाथ खडसे?
"भाजपमध्ये माझा प्रवेश करण्यात यावा, अशी विनंती मी भाजपकडे केली होती. मात्र, भाजपकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही. मी अजूनही राष्ट्रवादीचा आमदार आहे आणि शरद पवार यांनी मला राजीनामा देण्यास नकार दिला आहे. मी भाजपकडून प्रतिसादाची अजून काही दिवस वाट पाहील आणि नंतर माझ्या मूळ राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार आहे. जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये माझा भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला. पण, त्याला खाली विरोध झाल्याने तो जाहीर होऊ शकला नाही. त्यामुळे आता भाजपमध्ये राहणे उचित होणार नाही," असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:01 PM 02/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow