एसटी संप : चाकरमान्यांनी कोकणात गावी जाण्यासाठी रिझर्व्हेशन केलेल्या बसेसचं काय होणार?

Sep 4, 2024 - 10:38
Sep 4, 2024 - 10:43
 0
एसटी संप : चाकरमान्यांनी कोकणात गावी जाण्यासाठी रिझर्व्हेशन केलेल्या बसेसचं काय होणार?

मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे राज्यभरात प्रवाशांची कोंडी होताना दिसत आहे. याचा सर्वाधिक फटका गणेशोत्सवासाठी कोकणातील आपापल्या गावी जाण्याच्या तयारीत असलेल्या चाकरमान्यांना बसण्याची शक्यता आहे.

कोकणातील दापोली, खेड या एसटी आगारांमध्ये कर्मचाऱ्यांनी एसटी संपाला उत्स्फुर्त पाठिंबा दिला होता. याचा परिणाम कोकणातील एसटी सेवेवर दिसून येत आहे. मुंबई सेंट्रल आगारातून कोकणात जाणाऱ्या गाड्यांवर याचा प्रभाव जाणवत आहे. रात्री बाहेरील डेपोतून गाड्या मुंबई सेन्ट्रलमध्ये येणं अपेक्षित होते. मात्र, या एसटी बसेस आगारात न आल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे आता कोकणात नियोजित असलेल्या एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागू शकतात. तसे झाल्यास गणेशोत्सवाच्या तयारीसाठी आपल्या गावी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होण्याची दाट शक्यता आहे.

जिच्या भरवशावर गणेशोत्सवासाठी गावाला जायचं नियोजन केलं होतं त्याच एसटीनं दगा दिल्याने गाव गाठायचे कसे, असा प्रश्न चाकरमान्यांना पडला आहे. मुंबई सेन्ट्रलमध्ये कोकणात जाणाऱ्या आणि आरक्षण केलेल्या प्रवाशांनी वाहतूक नियंत्रण कक्षाला वेढा घातला आहे. काही अंशी गाड्या सुरु आहेत त्या गर्दी होत असलेल्या मार्गावरच सोडल्या जात आहेत. दुसरीकडे, प्रवाशांकडून कोकणात जाणाऱ्या गाड्या संदर्भात विचारणा केली जातेय. मात्र, चालक-वाहक उपलब्ध नसल्यानं गाड्या सुटत नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे देवाक काळजी रं म्हणणाऱ्या प्रवाशांनी आता पर्याय शोधायला सुरुवात केली आहे.

एसटी महामंडळाच्या गणपती विशेष गाड्यांमध्ये ४२०० गट आरक्षण आणि ७०० पेक्षा अधिक वैयक्तिक आरक्षणाचा सहभाग आहे. सर्वाधिक गाड्या ४,५ आणि ६ सप्टेंबर रोजी सुटणार असल्याने आंदोलन सुरु राहिल्यास प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आज अनेक प्रवाशांची तिकीटे आरक्षित आहेत. मात्र, सध्या मुंबई सेंट्रल एसटी आगारात बसेस नसल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अनेक प्रवासी तासभरापेक्षा अधिक काळ डेपोत थांबून आहेत.

जादा गाड्यांची संख्या किती?

आज
मुंबई - 337
ठाणे - 472
पालघर - 187

उद्या
मुंबई - 1365
ठाणे - 1881
पालघर - 372

शुक्रवार
मुंबई - 110
ठाणे - 96
पालघर - 70

सोलापूरमध्ये एसटी संपाचा परिणाम

एसटी कर्मचारी संपामुळे सोलापूर विभागातून होणाऱ्या वाहतुकीवर आज काहीसा परिणाम होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातून मुक्कामी येणाऱ्या बहुतांश एसटी बसेस सोलापुरात मुक्कामी आल्या नाहीत. तर गणेशोत्सवसाठी सोलापूर विभागातील जवळपास 235 बसेस कोकणाच्या दिशेने रवाना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काल दिवसभरात एसटी संपाचा कोणताही परिणाम न जाणवलेल्या सोलापूर विभागात बुधवारी काहीसा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. मात्र, सकाळपासून सोलापूर आगारतून सुटणाऱ्या गाड्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे धावत आहेत.

नागपूरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संमिश्र परिणाम

नागपूरमध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी व्हायला नकार दिल्याने अनेक फेऱ्या नियमित सुरु आहेत. संपकाऱ्यांनी नागपूर-इंदोर गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर ती गाडी सोडण्यात आली. एसटी कर्मचाऱ्यांची जनसंघ संघटना संपापासून दूर झाल्याने 30 टक्के कर्मचारी संपापासून दूर आहेत.

बुलढाण्यातली एसटी सेवेवर संपाचा किती परिणाम

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा परिणाम आता बुलढाणा जिल्ह्यात काही प्रमाणात जाणवायला लागला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सातही आगारातील कर्मचारी निम्याहून अधिक कर्मचारी संपावर असल्याने आज सकाळपासून राज्य परिवहन मंडळाची काही बसेस रस्त्यावर धावत आहेत तर अनेक बसेस रद्द झाल्या आहेत. त्यामुळे नोकरदार असू देत ,शालेय विद्यार्थी, वृद्ध प्रवासी यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे चित्र सध्या बुलढाणा जिल्ह्यात आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने व आगामी काळात गणेश उत्सव , गौरी गणपती असे उत्सव असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील सातही आजारातून थोड्या प्रमाणात का होईना बस सेवा सुरू आहे. आज संपाचा दुसरा दिवस असून आज पासून राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी आगार बंद आंदोलन बुलढाणा जिल्ह्यात करणार आहेत. त्यामुळे दुपारनंतर कदाचित बुलढाणा जिल्ह्यातील बस सेवा आगार बंद पडल्याने ठप्प होण्याची शक्यता आहे.

लातूरमध्ये एसटी सेवेची स्थिती काय?

एकीकडे एसटी महामंडळाच्या कर्मचारी यांनी मागण्यासाठी संप पुकारला आहे. जिल्ह्यामध्ये नऊ आगार असून या संपाचा परिणाम दिसून येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी 50 बसेस लातूर जिल्ह्यात पाठविण्यात आल्या आहे. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडत आहे. संपाचा हा दुसरा दिवस असून काल 9 आगारांमधून दहा ते बाराच बस सेवा तुरळक सुरू होत्या तर आज सकाळपासून या संपाचा परिणाम दिसून येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 04-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow