लांजा : कोल्हेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांवर कारवाई करण्याचे कोकण विभाग आयुक्तांचे आदेश

Sep 4, 2024 - 11:27
 0
लांजा : कोल्हेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांवर कारवाई करण्याचे कोकण विभाग आयुक्तांचे आदेश

◼️ सरपंच म्हणून काम करत असताना कामात अनियमितता आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका 

लांजा : तालुक्यातील कोल्हेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच वैदही विजय बेंद्रे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्त, कोकण विभाग, कोकण भवन यांचेकडून देण्यात आले आहेत.

याबाबतची तक्रार स्थानिक ग्रामस्थ संदेश सिताराम सावंत व ग्रामस्थ यांनी विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी आदेश देताना ग्रामपंचायतीचे कामकाज करताना चुकीच्या पद्धतीने काम करणे, कामकाजात अनियमितता आणि कर्तव्यात कसूर केली असा त्यांच्यावर ठपका ठेवत ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३, कलम ३९ (१) अन्वये दोषारोप निश्चित करून कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्त यांनी दिले आहेत .

याबाबतची तक्रार स्थानिक ग्रामस्थ संदेश सावंत व कोल्हेवाडी ग्रामस्थांनी केली होती. यामध्ये सरपंच वैदही बेंद्रे यांनी कामकाज करत असताना गावाला विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने ग्रामपंचायतीचे कामकाज केलेले आहे अशी तक्रार करताना त्यांची सखोल चौकशी करून आपल्या पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी सरपंचांसहित उपसरपंच वैष्णवी सावंत, सदस्य साक्षी शरद सावंत, अभिजीत नरेश सावंत यांची देखील चौकशी होऊन त त्यांचे पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.

ग्रामस्थांनी ही मागणी करत असताना अनेक मुद्दे मांडले होते. मौजे कोल्हेवाडी बाजारपेठ ते राजीवलेवाडी ,जोईलवाडी पाष्टेवाडी, सावंतवाडी या वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्याची तक्रार झाली होती. मात्र त्याच्या कामकाजासाठी ,खटल्यासाठी लागणारा निधी सरपंच यांनी ग्रामपंचायतीच्या फंडातून परस्पर निधी खर्च केला होता. त्याला तीन सदस्यांनी विरोध केला होता.वास्तविक यासाठी अन्य ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसभेत खर्चाच्या निधीसाठी

परवानगी घेणे आवश्यक होते. कारण हा खटला ग्रामपंचायतीवर नसून दोन व्यक्तीगत शेतकऱ्यांवर होता. पण सरपंच, उपसरपंच, दोन सदस्य व ग्रामसेवक यांनी मनमानीने खर्च केला.

सन २०२० ते २०२३ या तीन वर्षांचा पंधरावा वित्त आयोगानुसार केला जाणारा खर्च त्यांनी केला नाही. त्यामुळे गावात एकही विकास काम झाले नाही.२२/०५/२०२२ च्या ग्रामसभेत काळा दगड उत्खनन हा विषय ठेवण्यात आला. या विषयाला ग्रामसभेने विशेष विरोध दर्शवला व तसा विरोधी ठराव करण्यात आला. काळा दगड उत्खननासाठी परवानगी देऊ नये असे सांगण्यात आले. मात्र ग्रामसभेमध्ये शेवटच्या दोन ओळी ‘परंतु’ यावर ग्रामपंचायत बॉडीने आपल्या जबाबदारीवर तो निर्णय घ्यावा असे ठरविण्यात आले, अशा प्रकारचे वाक्य सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक चेतन दाभोळकर व अन्य दोन सदस्यांनी मिळून संमतीने ग्रामसभेच्या ठरावाशी छेडछाड केली. काळा दगड उत्खनन करिता आलेल्या पत्रा बाबत मासिक सभा २१/०७/२०२२ चा विषय ठेवण्यात आला होता. परंतु तो विषय मासिक सभेचा नसून ग्रामसभेचा आहे. त्याकरता ग्रामसभा लावून अजेंड्यावर विषय घ्यावा असे सांगण्यात आले. परंतु सरपंचांनी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी हा विषय ग्रामसभेमध्ये ठेवला नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

काळा दगडं उत्खननासाठी संबंधितांना ना हरकत दाखला देण्यापूर्वी पर्यावरणाचा दाखला, प्रदूषणाचा दाखला व अन्य इतर दाखल्यांची चौकशी न करता सरपंच व ग्रामसेवक यांनी चुकीच्या पद्धतीने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी ग्रामस्थांना विश्वासात न घेता ना हरकत दाखला दिला.दिनांक ३०/५/२०२३ च्या सभेमध्ये सुद्धा काळा दगड उत्खनन यांच्या विरोधात ठराव करण्यात आला. या सभेला निरीक्षक म्हणून पंचायत समिती विस्तार अधिकारी एस.एल. कांबळे हे उपस्थित होते .या सभेत ग्रामसभेच्या ठराव देण्यासाठी सरपंच यांनी दोन महिने टाळाटाळ केली व तो ठराव २/८/२०२४ ला देण्यात आला. यावेळी उपस्थित ३८ पैकी ३६ ग्रामस्थांनी विरोध केला. तो ठराव ३६ विरुद्ध २ असा मंजूर करण्यात आला होता.

दिनांक २७/४/२०२३ रोजी ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी सरपंच यांना विकास कामासंदर्भात अथवा स्टोन क्रशरर विरोधात प्रश्न विचारले असता सरपंच यांनी ग्रामस्थांना विरोधक म्हणून संबोधले. त्याचप्रमाणे ग्रामसभा चालू असताना ग्रामसभेमध्ये कांगावा करत ग्रामसभा सोडून निघून गेले व ग्रामस्थांच्या विरोधात पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली. जलजीवन मिशन मधील पाण्याच्या संदर्भात झालेल्या आराखडे सरपंचांनी गावातील ग्रामस्थांना न सांगता व सभा न घेता आराखडे तयार केले व तो मंजुरीला पाठवला. गावाला कोणत्याही प्रकारची विचारणा न करता सरपंच यांनी काळा दगड उत्खनना करिता संबंधित व्यक्तींना उत्खननासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले गेले अशा प्रकारचे विविध मुद्दे ग्रामस्थ संदेश सावंत आणि ग्रामस्थांनी उपस्थित करत याबाबतची तक्रार विभागीय आयुक्त, कोकण विभाग कोकण भवन यांच्याकडे केली होती .

या तक्रारीनुसार विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांनी सरपंच वैदही बेंद्रे यांच्यावर दोषारोप निश्चित करताना त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 04-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow