कशेडी बोगद्यातून धोकादायक वाहतूक

Sep 5, 2024 - 10:41
Sep 5, 2024 - 10:42
 0
कशेडी बोगद्यातून धोकादायक वाहतूक

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या बोगद्याच्या दुसऱ्या मार्गिकेतून ३ सप्टेंबरपूर्वी वाहतूक सुरू करण्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला होता. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांचा विश्वास संबंधित ठेकेदार यांनी नेहमीप्रमाणे खोटा ठरवला असून, अद्याप दुसऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झालेले नाही. कशेडी घाटातदेखील पोलादपूर बाजूला काम सुरू असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असल्याने परिणामी एका बोगद्यातून सर्व प्रकारची वाहने धोकादायक परिस्थितीत ये-जा करत आहेत. आगामी दोन दिवसांत महामार्गावर वाहनांची संख्या वाढणार असून, अनेक अपघात या भागात होण्याची भीती व्यक्त होत आहे.

चाकरमानी गणेशोत्सवासाठी दोन्ही बोगद्यांतून मार्गस्थ होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी कशेडी बोगद्याच्या पाहणीदरम्यान व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्षात दुसऱ्या बोगद्याचे काम धिम्या गतीने सुरू आहे. यामुळे गणेशोत्सवात दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता धुसर बनली आहे. ५ सप्टेंबर उजाडला तरी काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महामार्गावरील खड्यांमुळे गणेशभक्तांना यंदाही जीवघेणाच प्रवास करावा लागत आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी या मार्गाची पाहणी करत अधिकारी ठेकेदार यांचे कान धरले होते. महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत सोडून पळ काढणाऱ्या ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. माणगाव पोलिस ठाण्यात एका ठेकाधारक कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तरीही ठेकेदाराकडून याचे गांभीर्य घेण्यात आलेले दिसून येत नाही.

चाकरमान्यांची एका मार्गिकेतून वाहतूक
मुख्यमंत्री शिंदे यांनी दम दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग बांधकाम खात्याने महामार्गावरील खड्डे काहीअंशी बुजवले असले, तरी गणेशभक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी सर्वात महत्त्वाकांक्षी व वेळ वाचवणारा कशेडी बोगदा मात्र पूर्ण कार्यान्वित झालेला नाही. उलट घाटातून अवजड वाहतूक बंद करून ती सुद्धा क्षमता नसलेल्या कशेडी बोगद्याच्या एका मर्गिकेत सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे उत्सवापूर्वी या बोगद्यात वाहनांची गर्दी ही धोकादायक असून, चाकरमान्यांसाठी ही बाब भीतीदायक बनली आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 05/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow