चिमुकल्या मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन आई-वडिलांची १५ किमी पायपीट

Sep 5, 2024 - 14:40
 0
चिमुकल्या मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन आई-वडिलांची १५ किमी पायपीट

गडचिरोली : जोळी गेलेल्या दोन मुलांना अचानक ताप भरला. त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली. गावातीलच पुजाऱ्याकडे या मुलांना जडीबुटी देण्यात आली होती. त्याचा काहीच गुण आला नाही. मुलांना सरकारी दवाखान्यात न्यायचे तर पक्का रस्ताच नसल्याने ॲम्बुलन्स नाही, दुसरे वाहन नाही.

पण दुर्गम भागातील जिणे नशीबी आल्याने या दोघांना वाचवता आले नाही. मुलांचे दोन मृतदेह खांद्यावर घेऊन आई-वडीलांना 15 किलोमीटरची पायपीट करावी लागली. या दुर्दैवी घटनेवर जिल्हा परिषद कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अद्याप जिल्हा परिषद मार्फत या प्रकरणात कोणत्याही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका अंतर्गत येणाऱ्या “येर्रागड्डा” येथील रहिवासी रमेश वेलादी यांच्या मोठा मुलगा मोतीराम वेलादी सहा वर्ष व दिनेश वेलादी साडेतीन वर्ष या दोन मुलांना मोठा गंभीर ताप आला. एका पुजाऱ्यांकडून जडीबुटीची औषध देण्यात आली. परिस्थिती गंभीर झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे या दोन चिमुकल्यांच्या मृत्यू झाला. जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध असताना आरोग्य विभागाने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही. सध्या गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया आणि डेंगूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. या मुलांना मलेरिया झाल्याची प्राथमिक माहिती गावकऱ्यांनी दिली.

जिमलगटा येथे पोहोचल्यानंतर या दोन भावंडांच्या मृत्यू झाला. उपचारासाठी रुग्णवाहिका मागितली. रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे रागात पालकांनी मृतदेह खांद्यावर घेऊन 15 किलोमीटरचा प्रवास केला. या सर्व प्रकारामुळे आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.एकीकडे आपण देशाच्या अमृत महोत्सव साजरा करीत असून या गंभीर प्रकरणावर जिल्हा परिषदेचा कोणती कारवाई करणार याकडे जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे.

या सर्व प्रकारानंतर आता आई-वडिलांवर हा प्रकार ढकलण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणा करत असल्याचे समोर आले आहे. आई-वडिलांनी अगोदर पुजाऱ्याकडे उपचार केले आणि नंतर दवाखान्यात आणले. त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे.

"दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाल्याची माहिती खरी आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट आहे. या चिमुकल्यांना आधी पुजाऱ्याकडे नेले होते. आरोग्य केंद्रात येण्यापूर्वीच ते मृत्युमुखी पडलेले होते. रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला, पण नातेवाईकांनी ऐकले नाही. या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल मागविण्यात येईल." - डॉ. प्रताप शिंदे (जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:06 05-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow