चिपळूण : सावर्डे येथील कात उद्योग अखेर बंद

Sep 6, 2024 - 12:25
 0
चिपळूण : सावर्डे येथील कात उद्योग अखेर बंद

चिपळूण : तालुक्यातील सावर्डे येथील कात उद्योगाच्या दूषित सांडपाण्यावरून परिसरातील ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनापासून प्रांत कार्यालयासोर साखळी उपोषण सुरू केले होते. गुरूवारी झालेल्या संयुक्त पाहणीत कात उद्योग बंद असल्याचे दिसून आले. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन आणि माजी आमदार रमेश कदम यांनी यशस्वीरित्या मध्यस्थी केल्याने साखळी उपोषण स्थगित करण्यात आले. उद्योग सुरू करून पुन्हा दूषित पाणी सोडल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

सावर्डे येथील कात उद्योगातून कापशी नदीला दूषित पाणी सोडले जाते. त्याचा फटका सातगावच्या ग्रामस्थांना बसत असल्याच्या कारणावरून सावर्डे परिसरातील ग्रामस्थांनी प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले होते. स्वातंत्र्यदिनी सुरू झालेले साखळी उपोषण २१ दिवस सुरू होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय प्रादेशिक अधिकाऱ्यांनी कात उद्योगाला भेट देत पाहणी केली होती. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी संजय जिरापुरे, सावर्डेचे ग्रामविकास अधिकारी राजाराम माने, कृषी सहाय्यक रेश्मा पाकळे, उद्योग प्रतिनिधी सुयोग खेडेकर यांनी कात उद्योगाची संयुक्त पाहणी केली. या पाहणीत बंद स्थितीत बॉयलर दिसून आला. कच्चा माल खैर लाकूड मोकळ्या जागेत आढळले. बॉयलर भट्टी बंद आढळली. विद्युत पुरवठा खंडित असल्याचे दिसून आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 06/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow