कोयना धरणात १५.८५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा

May 31, 2024 - 11:31
May 31, 2024 - 11:37
 0
कोयना धरणात १५.८५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा

◼️ सध्याचा २०.९७ टीएमसी साठा; शनिवारपासून होणार तांत्रिक जलवर्षाचा प्रारंभ

चिपळूण : महाराष्ट्राची वरदायिनी कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षपूर्तीला आता अवघ्या एक दिवसांचा कालावधी शिल्लक  आहे. धरणात सध्या २०.९७ टीएमसी साठा शिल्लक आहे. यातील १५.८५ टीएमसी साठा उपयुक्त आहे. जून महिन्यात अपेक्षित पावसाची शक्यता गृहित धरली आहे तर ऐन उन्हाळ्यात धरणात वादळी पावसाच्या काळात जवळपास दीडशे मिलिमीटरचा टप्पा पावसाने पूर्ण केला आहे. या काळात झालेला पाऊस व पडलेले पाणी हे पूर्णपणे धरणांतर्गत विभागातील जमिनीत मुरल्याने त्याचा धरणातील साठ्यावर परिणाम झाला नाही. स्वाभाविकच १ जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या तांत्रिक जलवर्षाला धरणात सरासरी १५ ते १७ टीएमसी साठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. यावर्षी सिंचनाचा प्राधान्यक्रम लक्षात घेता पश्चिम वीजनिर्मितीच्या आरक्षित ६७.५० टीएमसी पाणीकोट्याला जवळपास १० टीएमसी पाण्याला आपोआपच कात्री लागली आहे. कोयना धरणातील साठ्याच्या मोजमापासाठी १ जून हा दिवस तांत्रिक वर्षाची सुरुवात मानली जाते. त्यामुळे १ जून २०२३ पासून सुरू झालेल्या या तांत्रिक जलवर्षात कोयनानगर येथे ४ हजार ६० मिलिमीटर, नवजा ५ हजार ६४२ मिलिमीटर, महाबळेश्वर ५ हजार ४५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी १ जूनला नव्या तांत्रिक वर्षाला सुरुवात होण्यापूर्वी धरणात १८ टीएमसी साठा होता.

पावसाची प्रतीक्षा
वर्षभरात आतापर्यंत धरणात ११२.६३ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. विविध कारणांसाठी पाणीवापरानंतर सध्या धरणात २०.९७ टीएमसी साठा आहे. यापैकी उपयुक्त १५.८२ टीएमसी पाण्यावरच यापुढील काळात चांगल्या पावसाळ्यापर्यंत आगामी वीजनिर्मितीसह सिंचनाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 31/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow