Ratnagiri : बाप्पाच्या उत्सवात जिल्ह्यातील बाजारपेठेत २० ते २५ कोटींची उलाढाल

Sep 9, 2024 - 12:43
 0
Ratnagiri : बाप्पाच्या उत्सवात जिल्ह्यातील बाजारपेठेत २० ते २५ कोटींची उलाढाल

रत्नागिरी : कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशोत्सवात जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठेत २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याचा अंदाज आहे. या उत्सवामुळे बाजारपेठेला चांगलीच चालना मिळाली आहे.

जिल्ह्यात १ लाख ६७ हजार १०२ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. पूर्वी चाकरमानी मुंबईहून येताना गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करत. मात्र, आता गाड्यांना असलेली गर्दी आणि तिकिटाची मारामार यामुळे स्थानिक बाजारपेठेतील खरेदीवर अधिक भर दिला जातो. बहुतांश गणेशमूर्ती स्थानिक मूर्तीशाळेतच खरेदी केल्या जातात. त्यासह रेडिमेड मखर, त्यासाठीचे साहित्य, सजावटीच्या विविध वस्तू, प्रसादासाठी लाडू, पेढे, पूजेचे साहित्य या सर्व गोष्टींमधून २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. जिल्ह्यात अडीच ते तीन हजार मूर्तिकार आहेत. इंधनवाढ, मूर्ती साहित्यातील महागाई यामुळे मूर्तींच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली. जिल्ह्यात केवळ मूर्ती व्यवसायामुळे आठ ते दहा कोटींच्या घरात उलाढाल झाली आहे.

मखर साहित्यात मोठी उलाढाल

गणेशमूर्तीबरोबरच मखराची सजावटही महत्त्वाची ठरते. हौसेने गणेशोत्सव साजरा करणारे लोक सजावटीवरही अधिक खर्च करतात. पडदे, झुंबर, विद्युत माळा, कृत्रिम फुलांच्या माळा, तोरणे, माळा, मण्यांच्या माळा, चक्र, रंगीत दिव्यांची तोरणे अशा साहित्याला विशेष मागणी होती. सजावटीच्या साहित्याच्या खरेदीमुळे जिल्ह्यात साडेआठ ते नऊ कोटींचा व्यवसाय झाला आहे.

मिठाई विक्रीचा गोडवा

सणाच्या काळात मिठाईला मोठी मागणी असते. विविध प्रकारचे पेढे, मोदक, लाडू यासह चिवडा, फरसाण यांचाही खप बऱ्यापैकी होता. घरोघरी आरती, भजनांच्या कार्यक्रमासाठीही तयार जिन्नस मोठ्या प्रमाणात खरेदी केला जातो. अनेक मिठाई विक्रेत्यांनी उकडीचे तसेच तळलेले मोदक खास ऑर्डर घेऊन विक्री केले. गौरीसाठी फराळाच्या पदार्थांत करंजी, विविध प्रकारचे लाडू, चकल्या, कडबोळी, चिवडा, शंकरपाळी, अनारशांना विशेष मागणी होती. त्यामुळे मिठाई व्यवसायातूनही ३० ते ३५ लाखांची उलाढाल झाली.

फुलांच्या विक्रीला टवटवी

कृत्रिम पानाफुलांच्या माळांनी मखराभोवती सजावट केली जाते. बाप्पाच्या गळ्यातही कृत्रिम फुलांचा हार घातला जात असल्याने कृत्रिम पानाफुलांचा खप चांगला झाला. कृत्रिम फुलांसह ताज्या फुलांचा वापर सजावटीबरोबर पूजेसाठी केला जातो. मखर सजावटीसाठी सुटी फुले, फुलांच्या माळा खरेदी करण्यात आल्या. दुर्वांच्या जुड्या, दुर्वांपासून तयार केलेले हार, झेंडू, गुलाब, शेवंती, जरबेरा तसेच सजावटीसाठी डेलियाला विशेष मागणी असल्याने या क्षेत्रातही २० ते २५ लाखांचा व्यवसाय झाला आहे.

फळविक्रीही जोमात

गणेशमूर्तीसमोर विविध प्रकारची फळे प्रसादाला ठेवली जात असल्याने फळांनाही वाढती मागणी होती. नैवेद्यासाठी केळीची पाने, हळदीची पाने, काकडी, चिबूड, नारळ यांचाही खप सर्वाधिक असल्याने त्यातूनही सुमारे पाच ते सहा लाखांचा व्यवसाय झाला.

पूजा साहित्य लखलखले

पूजेच्या साहित्यामध्ये धूप, अगरबत्ती, कापूर, वस्त्र, बुक्का, तुपाच्या तयार वाती, प्रसादासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी प्राधान्याने केली जाते. पूजेसाठी ताम्हण, निरजंन, समई, आरतीचे तबक, दिवा, करंडा, तांब्या पितळेच्या भांड्यासह व्हाईट मेटलची भांडी यातून पाच ते सात लाखांची उलाढाल झाली आहे.

दागिने विक्रीही अधिक

आर्थिकदृष्ट्या संपन्न भाविक दरवर्षी बाप्पाला सोन्या-चांदीची आभूषणे तयार करून अर्पण करतात. चांदीचे जास्वंदी फूल, मोदक, दुर्वा, हार, त्रिशूळ, मुकूट, बाजूबंद, कमरपट्टा पूजेसाठी पानसुपारी, तांब्या-पेला, प्रसादासाठी वाटी, ताट, करंडा, अत्तरदाणी, गुलाबपाणी भांडे खरेदी करण्यात येत होते. सर्वसामान्य ग्राहक गौरी-गणपतीसाठी इमिटेशन ज्वेलरी खरेदीवर समाधान मानत आहेत. एक ग्रॅम सोन्याच्या वस्तूंसाठी विशेष मागणी होती. त्यामुळे दागिन्यांची विक्री १० ते १५ लाखांत झाली.

वाद्यविक्रीचा नादही मोठा

ढोलकी, नाल, पखवाज, टाळ व चकवा, लहान मुलांसाठी विविध प्रकारचे ढोल, बेंजोचे साहित्य, ढोल पथकांसाठी लागणारे मोठे ढोल यातून वाद्य व्यवसाय अडीच ते तीन लाखांचा झाला आहे. दिवाळीइतकी नसली तरी गणेशोत्सवातही कपडे खरेदी मोठ्या प्रमाणात होते. या क्षेत्रातही पाच ते सात लाखांचा व्यवसाय झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:11 09-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow