Ratnagiri : आरत्या, भजनांच्या सुरांनी गणेशमय वातावरण..

Sep 10, 2024 - 09:26
Sep 10, 2024 - 09:27
 0
Ratnagiri : आरत्या, भजनांच्या सुरांनी गणेशमय वातावरण..

रत्नागिरी : जिल्ह्यात सर्वत्र आरत्या, भजनांचे मंजूळ सूर ऐकू येऊ लागले असून, सारे भक्त गणरायाच्या सेवेत मग्न आहेत. तबलापेटी अथवा टाळ-मृदंगाच्या साथीने सुरेल आवाजातील आरत्यांनी बाप्पाची आराधना केली जात आहे. वाडीवाडीत प्रत्येक घरी गणपती असल्याने किमान चार-पाच आरत्या, भजने करून पुढचे घर घेण्याकरिता साऱ्यांचीच लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने गावी आल्याने गावे गजबजली आहेत.

कोकणात ग्रामीण भागात घरगुती गणेशोत्सवाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने गावागावांत प्रत्येक घरात सामूहिक आरत्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. गणेशोत्सवाला प्रारंभ झाल्याने गावागावांमध्ये आता सामूहिक आरत्यांचे सूर घुमू लागले आहेत. कोकणातील खेडोपाड्यात घरगुती गणेशोत्सवाचे प्रमाण सर्वाधिक आहे. या सणानिमित्त बाहेरगावी असलेले कोकणवासीय हमखास एकत्र येतात. एकत्र कुटुंबांचा उत्सव एकाच घरात साजरा होतो. ग्रामीण भागात प्रत्येक घरामागे एका गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होते. गणेशोत्सवाच्या कालावधीत सकाळी व रात्री पूजा आणि आरत्या होतात.

सकाळी होणारी पूजा व आरती हा प्रत्येकजण आपल्या कामावर जाण्याच्या सोईनुसार करतो; मात्र संध्याकाळी होणारी पूजा ही ७ ते ९ या वेळेतच होते. या वेळी प्रत्येकजण आपापल्या घरी असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी होणाऱ्या पूजा व आरतीला ग्रामीण भागात प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरी जातात. प्रत्येकाच्या घरात सामूहिक आरती होत असल्याने प्रत्येकाच्या पूजेची वेळ ठरलेली असते. विशिष्ट कालावधीत ठराविक घरातच आरती होते. ही प्रथा गेली कित्येक वर्षे सुरू आहे. रात्रीच्या वेळी आबालवृद्ध या आरत्यांसाठी घरोघर फिरतात.

"सायंकाळी टाळ, झांजा, मृदुंग किंवा ढोलकी घेऊन आरतीसाठी तयारी केली जाते. प्रत्येक घरी आरती केली जाते. गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रत्येक दिवशीच्या रात्री हा उपक्रम सुरू आहे. प्रत्येक घरात प्रसादाचे वाटप होते. वाडीमध्ये आलेले मुंबईकर चाकरमानी, आबालवृद्ध आरतीत सहभागी होतात." - मोहन तेरवणकर, गणेशगुळे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:53 10-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow