बंदी आदेश झुगारून अवजड वाहने रस्त्यावर..

Sep 12, 2024 - 11:25
Sep 12, 2024 - 11:26
 0
बंदी आदेश झुगारून अवजड वाहने रस्त्यावर..

चिपळूण : गणेशोत्सव काळात ५ सप्टेंबरपासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना बंदीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

परंतु या महामार्गावर बिनबोभाट अवजड वाहनांची ये-जा सुरू आहे. त्यामुळे अवजड वाहन बंदीचा निर्णय फसल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. ही वाहने बाजारपेठेत आल्यानंतर वाहतूक कोंडीचे मुख्य कारण ठरत आहेत.

कोकणात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे. चार सप्टेंबरपासून चाकरमानी कोकणात दाखल झाले आता ते परतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे मुंबई ते गोवा महामार्गावर अवजड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी करण्यात आली आहे. वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु गणेशोत्सव काळात १६ टनापेक्षा कमी आणि जास्त वजन क्षमता असलेली वाहने महामार्गावरून सर्रास ये-जा करीत होती.

आधीच शहरातील रस्ते अरुंद आहेत. त्यात मोठ्या शहरातून गावी आलेल्या गणेश भक्तांच्या वाहनांची भर पडली आहे. चाकरमानी आपली वाहने घेऊन शहरात खरेदीसाठी येत आहेत. त्याच वेळेला एखादी अवजड वाहन आले तर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. बहादूरशेख नाका आणि खेर्डी परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. खेर्डी बाजारपेठ, ग्रामपंचायत कार्यालय परिसर आणि सती चिंचघरी परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. परशुराम घाट मार्गे येणारी अवजड वाहने कुंभार्ली घाटमार्गे जाण्यासाठी बहादूरशेख नाका, खेर्डी परिसरात येतात. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होते.

चिपळूणपासून संगमेश्वर आणि रत्नागिरी हातखंब्यापर्यंतचा रस्ता काही ठिकाणी एकेरी आहे. दुसऱ्या लेनचे काम सुरू आहे. एकाच लेनवरून वाहने ये-जा करीत आहेत. त्यामुळे खेरशेत, धामणी, कळंबस्ते फाटा, शास्त्रीपूल, संगमेश्वर बस स्थानक परिसर या टप्प्यात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

संगमेश्वर येथे असलेला अरुंद पूल वाहतूक कोंडीसाठी मुख्य कारणीभूत ठरत आहे. या ठिकाणी ट्रक आणि कंटेनर समोरासमोर आल्यानंतर छोट्या वाहनांना पुढे जाण्यासाठी मार्ग मिळत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहने वारंवार अडकून पडण्याचे प्रकार घडत होते.

महामार्गावर येणारी अवजड वाहतुकीची वाहने थांबवण्याचे काम महामार्ग पोलिसांनी केले पाहिजे. आमच्या हद्दीत आल्यानंतर ती वाहने थांबून ठेवली तर वाहतूक कोंडीमध्ये आणखी भर पडेल. त्यामुळे ही वाहने आम्ही पुढे पाठवतो. आमचे पोलिस वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. - अमित यादव, सहाय्यक पोलिस निरीक्षक, संगमेश्वर
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 12-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow