Ratnagiri : 'स्वच्छ भारत मिशन'अंतर्गत जिल्हास्तरीय स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धा

Sep 16, 2024 - 17:19
 0
Ratnagiri : 'स्वच्छ भारत मिशन'अंतर्गत जिल्हास्तरीय स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धा

रत्नागिरी : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्हास्तरीय स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो.

त्यानिमित्ताने स्वच्छता ही सेवा मोहीम १४ सप्टेंबरपासून २ऑक्टोबर 2024 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येत आहे. यावर्षीच्या स्वच्छता ही सेवा अभियानासाठी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही संकल्पना केंद्र शासनाने निश्चित केली आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांकरिता "स्वच्छ सुंदर शाळा" या जिल्हास्तरीय स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी विविध मुद्द्यांच्या आधारे स्पर्धेचे नियोजन करण्यात येणार आहे. 

हे मुद्दे असे - मुलींसाठी व मुलांसाठी वेगवेगळे शौचालय असणे आवश्यक, अपंग मुलांसाठी व्यवस्था, हात धुण्यासाठी व्यवस्था आवश्यक, ओला कचरा व सुका कचरा व्यवस्थापन असणे आवश्यक, सांडपाणी व्यवस्थापन असणे आवश्यक, पाऊस पाणी संकलन, परिसर स्वच्छता, किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यवाही असणे आवश्यक, शालेय भिंतींवर स्वच्छताविषयक संदेश असणे आवश्यक, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू विद्यार्थ्यांमार्फत तयार करणे आवश्यक, स्वच्छतेच्या अनुषंगाने शाळेने राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम. या निकषांच्या आधारे गुणांकन करून प्रत्येक तालुक्यातील एक उत्कृष्ट शाळेची निवड करण्यात येणार आहे. त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करून त्यामध्ये एक ते तीन जिल्हास्तरीय क्रमांक काढण्यात येणार आहेत. 

तालुकास्तरीय तपासणी समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग उपअभियंता, शिक्षण विस्तार अधिकारी, जिल्हास्तरीय तपासणी समिती, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग कार्यकारी अभियंता यांचा समावेश आहे. जिल्हास्तरावर पहिल्या तीन शाळांना अनुक्रमे १५ हजार, १० आणि ५ हजार रुपयांची रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांनी "स्वच्छ सुंदर शाळा" या स्पर्धेमध्ये भाग घेऊन स्वच्छता ही सेवा अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:46 16-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow