लांजा : वेरळ घाटातील मार्गाची रुंदी वाढवून उतार कमी करणार

Sep 20, 2024 - 16:00
Sep 20, 2024 - 16:08
 0
लांजा : वेरळ घाटातील मार्गाची रुंदी वाढवून उतार कमी करणार

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील अतिधोकादायक अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या व विविध अपघातांत आतापर्यंत शंभरहून अधिक बळी घेतलेला वेरळ घाट चौपदरीकरणानंतर कालबाह्य होणार आहे. मात्र, चौपदरीकरणात वेरल घाटाचा चढ-उतार कमी होऊन प्रवासी व वाहन चालकांचा प्रवास सुखकर होणार असला तरी चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनचालकांना अजूनही घाटाचा सामना करावा लागणार आहे.

तीन वर्षांपासून वेरळ घाटात दरड कटिंग करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. घाटातील मार्गाची रुंदी वाढवून उतार कमी करण्यात येणार आहे. मात्र, मुख्य मार्गाला जोडून चहामध्ये डाव्या बाजूला कच्चा मार्ग तयार करून उत्खनन करून ठेवण्यात आले आहे. हा वर्ग वाहनांना चढण्यासाठी असणार आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने सुरुवातीला वेग घेतला होता. त्यानंतर मात्र लांजा तालुक्यात काही ठिकाणी चौपदरीकरण काम अत्यंत धौम्या पद्धतीने सुरू आहे. घाटातील कामे अपूर्ण असून, इतर कामे पूर्ण झाल्याचा संबंधित यंत्रणेकडून निर्वाळा देण्यात आला आहे.

हा घाट आणि येथील असणारे यू आकाराचे वळण पूर्णपणे तोडण्यात येणार असल्याने भविष्यातील या ठिकाणचा अपघाताचा धोका टळणार आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामागोंवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुखद बाब असणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना लांजा तालुक्याच्या हद्दीमध्ये आंजणारी घाट, वेरळ घाट आणि तेथील यू आकाराचे वळण यासह वाकेड घाट, असे तीन ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र म्हणून सर्वपरिचित आहेत. यामधील सर्वाधिक धोकादायक आणि अपघातास कारणीभूत ठरणारे ठिकाण म्हणून वेरळ येथील यू आकाराचे वळण, घाट अत्यंत अवघड ठिकाण आहे. 

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण काम सुरू असून, वेरळ घाटात रुंद व तीव्र असलेला उत्तार कमी करण्यात येणार आहे. याशिवाय या घाटामधून ये-जा करण्यासाठी असे दोन मार्ग करण्याचे काम सुरू आहे. मात्र, महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत अवजड वाहनांना वेरळ घाटातील यू आकाराच्या अवघड वळणाचा सामना करावा लागणार आहे. घाटात शंभरहून अधिक बळी, तर १८ वेळा अवजड कंटेनर अडकल्याच्या घटना घडल्या आहेत, तर घाटात वाहने बंद पडल्यास वारंवार मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत असते. यावेळी महामार्ग पोलिस व संबंधित यंत्रणेची दमछाक होते.

मुख्य मार्गाला जोडूनच दुसरा मार्ग
निवळी ते वाकेड टप्प्यामधील ६० टक्के काम पूर्ण झाल्याचा निर्वाळा देण्यात येत असला तरी वेरळ घाटातील काम अद्यापही पूर्णत्वाला गेलेले नाही. घाटाचे रुंदीकरण व घाट कमी झाल्यास वाहनचालकांना सुरक्षित प्रवास करता येणार आहे. यू आकाराच्या अवघड वळणामधून डोंगर दरड तोडून मुख्य मार्गाला जोडूनच दुसरा मार्ग तयार करून कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, तेही काम अपूर्ण आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:16 PM 20/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow