रत्नागिरीत साकारणार महाराष्ट्रातील पहिले ध्यानकेंद्र

Sep 20, 2024 - 17:11
Sep 20, 2024 - 17:13
 0
रत्नागिरीत साकारणार महाराष्ट्रातील पहिले ध्यानकेंद्र

रत्नागिरी : शहरातील संसारे उद्यानामध्ये ४० फूट उंचीची भगवान गौतम बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती असलेले ध्यानकेंद्र उभारण्यात येणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येणाऱ्या या ध्यानकेंद्रासाठी २० कोटी रुपये खर्च येणार आहे.

हे महाराष्ट्रातील पहिले केंद्र असून, त्याचे काम सुरू झाले आहे. या प्रशस्त इमारतीत १२० नागरिकांना एकाचवेळी ध्यान करता येणार आहे.

या कामासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात पाच कोटी, तर दुसऱ्या टप्प्यात १५ कोटी रुपये मिळाले आहेत. या ध्यानकेंद्रामुळे रत्नागिरी शहरात आध्यात्मिक केंद्र सुरू होणार आहे. पर्यटनवाढीसाठी पालकमंत्री सामंत यांनी रत्नागिरी शहरात ही नवी संकल्पना आणली आहे. शहरातील संसारे उद्यानात या ध्यानकेंद्राचे काम सुरू आहे. पूर्वी या उद्यानाची देखभाल दुरुस्ती होत नव्हती. त्यामुळे उद्यानाची दुरवस्था झाली होती. मात्र, आता या जागेत हे ध्यानकेंद्र उभारले जात आहे. येथील इमारतीत नागरिकांना ध्यान सभागृह, आध्यात्मिक बुक स्टॉल, सुशोभित उद्यान आणि वाहनतळाची व्यवस्था असेल. रत्नागिरी नगर परिषदेने ध्यानकेंद्र उभारण्याचे काम स्वामी कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे.

पालकमंत्री सामंत यांनी गेल्या काही दिवसांमध्ये शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी विशेष पावले उचलली आहेत. मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ उभारलेली शिवसृष्टी, जिजामाता उद्यानात संभाजींचा पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि स्वा. सावरकर पुतळ्याजवळ म्युरल्स उभारण्यात आली आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळाली आहे. त्याचबरोबर शहर सुशोभीकरणाची विविध कामे सुरू असल्यामुळे रत्नागिरी सुंदर शहर ही संकल्पना प्रत्यक्षात उतरेल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी शहरातील संसारे उद्यानात ध्यानकेंद्र उभारण्यात येणार आहे. या ध्यानकेंद्राचे काम हे नगर परिषदेच्या अखत्यारित असून, स्थानिक कंपनीला याचा ठेका देण्यात आला आहे. या कामाला एक वर्षाची मुदत असून, सुमारे २० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. - तुषार बाबर, मुख्याधिकारी, नगर परिषद, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:37 PM 20/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow