रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटणार

Sep 17, 2024 - 11:48
 0
रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटणार

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील प्रमुख रेल्वे स्थानकांचे सध्या रुपडे बदलत असून, हे रेल्वे स्टेशन की एअरपोर्ट असा प्रश्न पडावा, असा कायापालट रेल्वे स्थानकांचा होत आहे. चिपळूण, सावंतवाडी, कणकवली, राजापूर, संगमेश्वरसह अनेक रेल्वे स्थानकांचा चेहरामोहराच बदलत चालला आहे. त्यात रत्नागिरी रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे. पुढील दोन-तीन महिन्यांत या स्थानकाचे काम पूर्ण होऊन अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त रत्नागिरी रेल्वेस्थानक प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. कोकण रेल्वेची अनेक रेल्वे स्थानके हि शहरापासून बाहेर व मुख्य रस्त्यांपासून थोडी एका बाजूला आहेत. त्यामुळे या रेल्वे स्थानकांकडे जाणाऱ्या रस्त्यांचीही दुरवस्था झाली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रथम जोडरस्त्यांची कामे मार्गी लावली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रेल्वे स्थानकांच्या अद्ययावतीकरणाची कामे हाती घेण्यात आली. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वतः लक्ष घालत प्रमुख रेल्वे स्थानकांची निवड केली. यात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रेल्वेस्थानकांचा समावेश आहे.

चिपळूण व संगमेश्वर रेल्वे स्थानकांची कामे पूर्णत्वाला आली आहेत, रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे काम वेगाने सुरू आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत हे काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे या स्थानकाचे काम करणाऱ्या बांधकाम कंपनीच्या अभियंत्याने सांगितले.

रेल्वे स्थानकामधील रस्त्यांचे कॉक्रिटीकरण करण्यात आले असून, रिक्षा स्टॉपची जागा बदलून त्यांना स्थानकाच्या सुरवातीलाच नवीन जागा देण्यात आली आहे. याठिकाणी शेड मारून रिक्षा थांबाही अद्ययावत करण्यात आला आहे.

कोकणामध्ये जांभा दगड मुबलक मिळत असल्याने, या जांभ्या दगडाची आठवण म्हणून जांभ्याच्या टाईल्सचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानक अधिकच लक्षवेधी दिसून येत आहे. रेल्वेस्थानक इमारतीच्या सुरुवातीलाच बसवलेले कोकण रेल्वे रत्नागिरी हे नावही आकर्षक वाटत आहे. रेल्वेस्थानकाचा चेहरामोहरा बदलत असून, हे बदल प्रवाशांच्या कौतुकाचा विषय ठरत आहेत.

रत्नागिरी रेल्वे प्लॅटफॉर्मसाठी एमआयडीसीकडून निधी
रेल्वे स्टेशनसोबतच आता रत्नागिरी रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्मचीही नव्याने डागडुजी हाती घेण्यात येत आहे. यासाठी एमआयडीसीने सुमारे ३७ कोटींचा निधी दिला आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यात पुढाकार घेत लक्ष दिले आहे, त्यामुळे प्लॅटफॉर्मवरील प्रवासी निवारा शेड नव्याने उभारल्या जाणार आहेत. प्रवाशांसाठी अत्यावश्यक सुखसोयी प्लॅटफॉर्मवर दिल्या जाणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 17/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow