गुहागर : गत १२ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या मागणीसाठी २४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालक यामध्ये सहभागी होणार असून, त्यांनी नुकतेच चिपळूण दौऱ्यावर येऊन गेलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनही दिले.
निवेदनात म्हटले आहे की, सुमारे १२ वर्षांपासून ग्रामविकास विभागाने संग्राम व आपले सरकार सेवा केंद्र या दोन्ही प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे २९ हजार ग्रामपंचायतमध्ये २० हजार संगणक परिचालक राज्यातील ७ कोटी ग्रामीण जनतेला विविध प्रकारच्या ऑनलाईन व ऑफलाईन सेवा देत आहेत. शासनाची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आदी अनेक प्रकारचे कामे संगणक परिचालकांनी केली आहेत व करीत आहेत; परंतु राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे.
१ जुलै २०२४ पासून राज्यातील सुमारे २० हजार संगणक परिचालकांना शासनाने बेरोजगार केल्याचे दिसून येत आहे, हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सुमारे २० हजार तरुण व तरुणीवर झालेला मोठा अन्याय असून, हजारो संगणक परिचालक तरुण-तरुणींना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देऊन आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी या निवेदनातून संगणक परिचालकांनी केली आहे. निवेदन देताना चिपळूण तालुका संघटनेच्या अध्यक्षा सुजाता पवार यांच्यासह सर्व संगणक परिचालक उपस्थित होते.
मानधनवाढीला ग्रामपंचायतींचा विरोध
संगणक परिचालक फक्त ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन मागत आहे. हा प्रश्र शासनाने सोडवणे अत्यंत गरजेचे असताना ७००० रुपये असलेले मानधनात ३००० ची वाढ करून १०,००० करण्यात आले असल्याचा शासन निर्णय शासनाने १९ जून २०२४ रोजी निर्गमित केला आहे. परंतु ही मानधनवाढ राज्याच्या निधीतून न करता ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून केल्याने राज्यातील ग्रामपंचायतींनी या मानधन वाढीस विरोध केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 24/Sep/2024