“पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यापूर्वी देशाला संघटित करण्याचे आणि इंग्रजांच्या अत्याचारातून मुक्त करण्याचे ऐतिहासिक काम केले. नेहरू हे नेहरू होते; त्यांच्या कर्तृत्वाची आणि देशाच्या इतिहासातील त्यागाची बरोबरी इतर कोणाशीही होऊ शकत नाही.
नेहरू आणि मोदी याची तुलना करणे अशक्य आहे”, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा वर्धापन दिन मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये पार पडला. या कार्यक्रमात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शरद पवार यांनी मार्गदर्शन केले.
शरद पवार म्हणाले, “सत्ता असो वा नसो, तुम्ही कार्यकर्त्यांनी कधी त्याची चिंता केली नाही. अनेकांनी आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा काळ विरोधी पक्षात घालवला आहे. सत्ता असली की आपण सत्तेच्या माध्यमातून काम करतो आणि सत्ता नसेल तेव्हा लोकांमध्ये जाऊ काम करतो. हीच आपली खरी परंपरा आहे.”
त्यांच्यावर भाष्य न केलेलंच बरं
“आज सुशिक्षित बेरोजगार, आदिवासी, महिला आणि अल्पसंख्याक अशा विविध घटकांच्या समस्यांनी देशाला ग्रासले आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना या प्रश्नांवर किती आस्था आहे, यावर भाष्य न केलेलंच बरं. काही लोक सतत एकच गोष्ट सांगायचा प्रयत्न करत आहेत की, या देशात असा एखादा पूर्वी नेता झालाच नाही”, असेही शरद पवार म्हणाले.
“नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहे आणि पंतप्रधान पद हे एक संस्थात्मक पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखणे हे प्रत्येक भारतीयाचे काम आहे. आम्ही धोरणात्मक गोष्टींवर नक्कीच टीका करू, पण या सर्वोच्च पदाचा अनादर कधीही करणार नाही”, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली.
पवार म्हणाले, “नेहरूंनी अनेक वर्षे तुरुंगवास भोगला”
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, “मोदींना अधिक काळ पंतप्रधानपद मिळाले ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या चाहत्यांची ती इच्छा असू शकते; पण ही स्पर्धा नेहरूंशी होऊ शकते का? पंतप्रधान होण्यापूर्वी नेहरूंनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली दीर्घ काळ संघर्ष केला. अनेक वर्षे तुरुंगवास भोगला आणि इंग्रजांना देशातून बाहेर काढण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे, हा इतिहासाचा भाग कोणीही विसरू शकत नाही.”
“काँग्रेसच्या लोकांनी शिखांवर हल्ला केला, असे एक मंत्री पंजाबमध्ये जाऊन बोलले. त्यांनी लक्षात घ्यावं की, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी बलिदान दिले आहे. नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधी यांनी देशासाठी काम केले. पाकिस्तानला धडा शिकवला. त्यांचे चिरंजीव राजीव गांधी यांची देखील हत्या झाली. त्यामुळे नेहरू कुटुंबाचा त्याग कोणीही विसरू शकत नाही. त्यामुळे त्यांची तुलना कोणासोबत होऊ शकत नाही”, असे शरद पवार गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले.
पुढील आंदोलनाची रणनीती ठरवणार
शरद पवार म्हणाले की, “सामान्यांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी तत्पर राहील. आगामी काळातील संघर्षासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे. पुढील ८ ते १० दिवसांमध्ये आपण सर्व प्रमुख नेते एकत्र बसणार आहोत. देशातील विविध ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करून सरकारला जाब विचारण्यासाठी आणि आंदोलनाची रणनीती निश्चिती करण्यासाठी पुढील दिशा ठरवली जाईल”, असे पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:02 10-06-2026














