Eknath Shinde: ‘पंतप्रधान मोदींनी देशाला दिली जागतिक ओळख आणि महाराष्ट्राच्या विकासाला अभूतपूर्व गती’ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

१२ वर्षांत महाराष्ट्राला १० लाख कोटींचा निधी; पंतप्रधानांच्या अभिनंदनाच्या ठरावावर उपमुख्यमंत्र्यांचे विधिमंडळात भाषण

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या बारा वर्षांच्या कार्यकाळात भारताला जागतिक स्तरावर एक नवी आणि बलशाली ओळख मिळवून दिली असून, देश आता वेगाने आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. केंद्र सरकारच्या या भक्कम पाठिंब्यामुळेच महाराष्ट्राच्या विकासालाही अभूतपूर्व गती मिळाली आहे, असे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. विधिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचला आणि पंतप्रधानांचे जाहीर आभार मानले.

४३९८ दिवसांचा ऐतिहासिक विक्रम आणि अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, इतिहासात सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी ४३९८ दिवसांचा मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. मात्र, त्यांनी केवळ दिवसांचा विक्रम केला नाही, तर भारताचा डंका जगभरात वाजवण्याचे ऐतिहासिक काम केले आहे. त्यांच्याच कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून थेट चौथ्या क्रमांकावर आली असून, ती जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्याचा त्यांचा संकल्प आहे. भारत आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असल्याचा अभिमान आज प्रत्येक भारतीयाला वाटत आहे, असेही शिंदे यांनी नमूद केले.

विकसित भारत २०४७ चा रोडमॅप आणि जागतिक लोकप्रियता पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचे कौतुक करताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, मोदी यांनी ‘विकसित भारत २०४७’ ही संकल्पना मांडून पुढील २१ वर्षांचा स्पष्ट रोडमॅप देशासमोर ठेवला आहे. जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांपैकी एक म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली असून, आतापर्यंत जगातील ३३ देशांचे सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. ही बाब प्रत्येक नागरिकासाठी भूषणावह आहे. याशिवाय, ‘विकास ते विरासत’ या संकल्पनेतून पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच देशाच्या सांस्कृतिक वारशाचे जतनही करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांसाठी केंद्राचा मोठा निधी महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या योगदानाचा उल्लेख करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात कार्यरत असलेल्या ‘डबल इंजिन’ सरकारच्या माध्यमातून कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि वाढवण बंदर यांसारख्या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. तत्कालीन युपीए (UPA) सरकारच्या काळात महाराष्ट्राला केवळ दोन लाख कोटी रुपयांचा निधी मिळाला होता; मात्र मोदी सरकारने गेल्या बारा वर्षांत तब्बल दहा लाख कोटी रुपयांचा निधी राज्याला दिला आहे. याच सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा दर्जा’ देण्याचे ऐतिहासिक काम करून मराठीचा देशभरात प्रचार-प्रसार केला.

Tata sierra

वैयक्तिक जिव्हाळा आणि बाळासाहेबांच्या स्वप्नांची पूर्ती उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी असलेल्या वैयक्तिक नात्याचे काही प्रसंग आवर्जून सांगितले. “माझ्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानंतर त्यांनी आपुलकीने चौकशी केली होती, तसेच निवडणूक प्रचारात माझा आवाज बसला असताना उपचारांचा सल्ला दिला होता,” अशी आठवण त्यांनी सांगितली. खासदार श्रीकांत शिंदे परदेश दौऱ्यावर गेले असतानाही मोदी यांनी कुटुंबाची आस्थेने विचारपूस केली होती. कोणतीही सुट्टी न घेता सतत काम करणारे त्यांचे कष्ट प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत. शेवटी, अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणे आणि काश्मीरमधील कलम ३७० हटवणे हे वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते, ही दोन्ही स्वप्ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:19 10-06-2026