लांजा : तालुक्यातील साटवली ग्रामपंचायतीने यापुढे आपल्या कार्यक्षेत्रात तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, पानमसाला यासारख्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा ठराव केला आहे. तशा सूचना सर्व संबंधित दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.
दारू, मटका, जुगार त्याचप्रमाणे तंबाखूजन्य पदार्थ यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्यास धोका संभवतो. त्याचप्रमाणे कौटुंबिक कलह देखील निर्माण होत असतात. याच अनुषंगाने यापूर्वी साटवली ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर साटवली ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा विक्री यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व दुकानदार, व्यापारी यांना देण्यात आले आहे.
यापुढे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या (पान मसाला, सुगंधी सुपारी, जर्दा) विक्रीवर बंदी करण्याचा ठराव करण्यात आला आहे. गुटख्यामुळे तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. तसेच अन्ननलिकेचा अल्सर व कॅन्सरही होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे तरुण पिढी बरबाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच यापुढे अशा प्रकारचे जीवघेणे पदार्थ आपल्या दुकानांमध्ये विक्रीस ठेवू नयेत, अशा प्रकारच्या सूचना ग्रामपंचायतीने सर्व दुकानदारांना दिल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 24/Sep/2024