स्वतःची निष्क्रियता झाकण्यासाठी आरोप : पालकमंत्री उदय सामंत

राजापूर : केवळ भावनिक राजकारण करून आणि खोटी आश्वासने देऊन निवडून आलेले लोकप्रतिनिधी त्यांच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात काहीच विकासात्मक काम करू शकलेले नाहीत. आपली निष्क्रियता झाकण्यासाठी आता आमच्यावर आरोप करत आहेत आमची निष्ठा विचारत आहेत. मात्र ज्यांनी सन २००४ च्या निवडणुकीपासून आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत आपली निष्ठा विकली त्या गद्दारांनी मला निष्ठा शिकवू नये, अशी घणाघाती टीका राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी आ. राजन साळवी यांचे नाव न घेता केली.

खोटा आक्रमकपणा दाखवायचा, जनतेची दिशाभूल करायची हाच आता त्यांचा कार्यक्रम असून जर आक्रमकता दाखवायची होती तर ती प्रांत कार्यालय निर्मितीसाठी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी, इथल्या जनतेच्या विकासाठी दाखवयाची होती असा टोलाही ना. सामंत यांनी लगावला आहे. आक्रमकता डोक्याची हवी, विचारांची हवी, विकासाची हवी, असे नमुद करत काही न केल्यानेच आज लोक तुम्हाला कंटाळून सोडून जात आहेत असाही टोला ना. सामंत यांनी लगावला.

राजापुरातील प्रांताधिकारी कार्यालयाच्या भूमिपुजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी आ. साळवी यांचा खरपूस समाचार घेतला. असे निष्क्रिय लोकप्रतिनिधी असले की कसा विकास खुंटतो ते आपण गेले १५ वर्षे पहात आहात, आता काम करणारा हक्काचा लोकप्रतिनिधी निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

माझ्या निष्ठेवर हे बोलतात यांची पात्रता तरी आहे का आमाच्यावर बोलण्याची असा खडा सवाल उपस्थित करून सन २००४ च्या निवडणुकीपासून आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत तुम्ही निष्ठा कशी विकलात, कोणाला भेटलात, कुठल्या हॉटेलमध्ये भेटलात हे जाहीर करू का? असा खडा सवाल ना. सामंत यांनी उपस्थित केला. निष्ठेच्या पोकळ गप्पा मारणाऱ्यांची कुंडली आपल्याकडे आहे, असेही ना. सामंत म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 24/Sep/2024