रत्नागिरी : तुम्ही शासनामधील कुटुंब आहात, चळवळ निर्माण करून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना घराघरांत पोहोचवा. सरकार तुम्हाला ताकद देतेय. सीएमईजीपी, पीएमईजीपी, लखपती दीदी योजनांचा फायदा करून घ्या, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. येथील स्वयंवर मंगल कार्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये कार्यरत रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातील समुदाय संसाधन व्यक्तींना मोफत अँड्राईड मोबाईलचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव आदी उपस्थित होते. पालकमंत्री सामंत म्हणाले, सीआरपींना मोबाईल देण्याचा मी शब्द दिला होता. त्याचे वितरण आज पार पडतेय, त्याचा मला मनापासून आनंद होत आहे. स्वतःच्या मोबाईलमधून महिला बचत गटांसाठी महिलांना काम करता येणार आहे. कोणाच्याही मोबाईलवर आता महिला भगिनींना अवलंबून राहण्याची गरज नाही. ५ मतदारसंघांत प्रभाग संघांसाठी २५ कार्यालये देण्यात आली आहेत. उर्वरित कार्यालये पुढील डिसेंबरमध्ये मिळणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत ग्रामीण भागातील महिलांना मिळालेले पंधराशे रुपये हे पंधरा लाखांसारखे आहेत. सप्टेंबरमध्येही अर्ज भरला तरीही ३ महिन्यांचे पैसे त्या महिलेला मिळणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
त्यासाठी वर्षाला ४६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्याच्या विकासात महिलांचा सिंहाचा वाटा असणार आहे. कारण ४६ हजार कोटींचा व्यवहार राज्यात चालणार आहे. हे पैसे व्यापारात फिरणार आहेत. व्यापाराची उन्नती होणार आहे. टॅक्सच्या स्वरूपात सरकारलाही पैसे मिळणार आहेत. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत १ ते ३ लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. त्याचबरोबर प्रशिक्षणासाठीही पैसे मिळणार आहेत. या योजनेचे राज्यात २ लाखजणांना लाभ देण्यात आला आहे. त्यामध्ये ६१ टक्के महिला आहेत. ही योजना चळवळ निर्माण करून घराघरांत पोहोचली पाहिजे. सीआरपींनी महिला बचत गटाच्या माध्यमातून ताकद निर्माण करावी, असे ते म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 24/Sep/2024