जनतेने कुणासोबत राहायचे हे ठरवण्याची वेळ : ना. उदय सामंत

रत्नागिरी : थिबा राजाकालीन बुद्धविहार बांधण्याबाबत दिलेला शब्द मी पूर्ण करु शकलो याचा मला अभिमान असून, ते वर्षभरात पूर्ण करणार आहोत. या बुद्धविहारमधून देशभर शांतीचा संदेश जावा, अशा भावना पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच मी आज मंत्री बनू शकलो; परंतु जातिधर्मात भेद लावण्याचा प्रयत्न सध्या सुरू असून, जनतेने कुणासोबत राहायचे, याचा निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचेही प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.

सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत राज्य उत्पादन शुल्क कार्यलयामागे असणाऱ्या थिबाकालीन बुद्धविहार विकसित करण्याच्या कामाचा शुभारंभ यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. याच कार्यक्रमावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कार्यालयाचे भूमिपूजनही पालकमंत्री सामंत यांनी केले. यावेळी धिबाकालीन बुद्धविहार विकास समितीचे पदाधिकारी प्रकाश पवार, एम. वी. कांबळे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अधीक्षक अभियंता मिलिद कुलकर्णी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विजय चिंचाळकर, रत्नागिरीच्या अधीक्षक कीर्ती शेडगे, प्रांताधिकारी जीवन देसाई, मुख्याधिकारी तुषार बाबर, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मागील पन्नास वर्षांपासून या बुद्धविहारासाठी जागा द्यावी म्हणून समाजातील व्यक्ती प्रयत्न करीत होते. आपणही गेली दहा वर्षे सातत्याने येथील प्रमुख व्यक्तींबरोबर जाऊन मंत्रालयात बैठका घेत होतो; परंतु हा प्रश्न दोन महिन्यांपूर्वी मार्गी लागला. त्यानंतर जिल्ह्या नियोजनमधून यासाठी ७ कोटींहून अधिकचा निधी आपण दिला आहे. हा कार्यक्रम ठरल्यानंतरही काहीजण विरोधात समाजमाध्यमात माझ्या विरोधात पोस्ट शेअर करीत आहेत. या पोस्ट शेअर करणाऱ्यांचे करायचे काय, याचा निर्णय आता तुम्हीच घ्या. हा बुद्धविहार वर्षभराच्या आत पूर्ण करून, स्वाधीन केला जाणार असल्याचेही ना. सामंत म्हणाले.

डॉ. आंबेडकर यांनी संविधान लिहिले. आरक्षण दिले. हेच आरक्षण रद्द करणार म्हणून राहुल गांधी परदेशात जाऊन सांगत आहेत; परंतु त्यांच्यावर कोणी काही बोलायला तयार नाही, याची खंत वाटते. याच राहुल गांधींच्या वडिलांनी त्यावेळी संविधान बदलू, असे सांगितले होते, असेही ना. सामंत यांनी सांगितले. मतदानाचा अधिकार देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त तुम्ही मानता, असे नाही, तर या देशातला प्रत्येक समाज हा भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांचा ऋणी आहे; कारण त्यांच्यामुळे आम्हालाही पदे मिळालेली आहेत. महायुतीच्या सरकारमध्ये काम करणारा प्रत्येक माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये शिक्षणासाठी ज्या घरात राहिले, तेथे आता स्मारक करण्यात आले असून त्या घराला भेट देण्याचा मला योग आला. यावेळी माझा ऊर भरून आला. लंडन येथे जाऊन हे स्मारक पाहण्याची आर्थिक स्थिती तुम्हा सर्वांची व्हावी, अशी प्रार्थना करतो.

सध्या चांगल्या कामापेक्षा समाजासमाजामध्ये वाद लावण्याचे काम सुरू असून या बुद्धविहारातून शांतीचा संदेश रत्नागिरी जिल्ह्यात, कोकणातच नव्हे, तर देशाच्या कानकोपऱ्यात जावा, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी बुद्धविहार समितीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 24/Sep/2024