दापोलीतून १२ वर्षीय मुलाचे अपहरण? गुन्हा दाखल

दापोली: दापोली तालुक्यातील जालगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सायकल फिरवण्यासाठी गेलेल्या एका १२ वर्षीय बालकाचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस मुलाचा कसून शोध घेत आहेत.

अलोक जयेंद्र मोरे (वय १२ वर्षे, ४ महिने, ३ दिवस) असे अपहरण झालेल्या बालकाचे नाव आहे.

सायकल घेऊन गेला अन् परतलाच नाही…

याप्रकरणी दर्शन जनार्दन मोरे (वय ३६, रा. जालगाव, ता. दापोली) यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलोक हा १६ मे रोजी सकाळी सुमारे १०:३० वाजण्याच्या सुमारास ‘सायकल फिरवण्यासाठी जातो’ असे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र, बराच वेळ झाला तरी तो घरी न परतल्याने कुटुंबीयांना काळजी वाटू लागली.

नातेवाईक आणि मित्रांकडे शोध, अखेर पोलिसांत धाव

अलोक घरी न आल्याने कुटुंबीयांनी तातडीने त्याचा जालगाव परिसरात, संपूर्ण गावात, त्याच्या मित्रपरिवाराकडे तसेच दापोलीतील नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, रात्री उशिरापर्यंत अलोकचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. अलोक हा अल्पवयीन असल्याने त्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याला फूस लावून पळवून नेल्याची खात्री कुटुंबीयांना झाली. त्यानंतर त्यांनी तात्काळ दापोली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्याकडे तपास

या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्याकडे या गुन्ह्याचा पुढील तपास सोपवण्यात आला आहे. दापोली पोलीस जालगाव आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर मार्गांनी अलोकचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे दापोली तालुक्यात बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:16 18-05-2026