अकरावी शून्य फेरीत ३९ हजार प्रवेश; आजपासून पहिली फेरी

मुंबई : राज्यातील शून्य फेरीसाठी विविध कोट्यांतर्गत १८ मे ते १९ मे या कालावधीत ३९ हजार ६१३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित केले आहेत, तर गुरुवारपासून नियमित पहिली फेरी सुरू होणार आहे.

शून्य फेरीमध्ये ९,२६३ कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी करण्यात आली आहे. या फेरीमध्ये एकूण विद्यार्थी क्षमता २० लाख ३० हजार ३३३ असून त्यापैकी कॅप फेरीसाठी प्रवेश क्षमता १६ लाख ७० हजार २९३, तर कोटा प्रवेश क्षमता ४ लाख ५९ हजार ६५३ इतकी आहे. यासाठी एकूण ९ लाख ५४ हजार ८६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती.

विविध कोट्यांतर्गत झाली प्रवेश निश्चिती
राज्यभरात एकूण इन-हाऊस कोट्यामध्ये २१ हजार ७३८ प्रवेश, व्यवस्थापन कोट्यामध्ये ४७३८, अल्पसंख्याक कोट्याअंतर्गत १३ हजार १३७, तर सर्व विभाग मिळून ३९ हजार ६१३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
झाले आहेत.
ज्या विद्यार्थ्यांनी शून्य फेरीमध्ये कोट्यांअंतर्गत प्रवेश निश्चित केलेला आहे, त्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रवेश फेऱ्यांमधून वगळण्यात येतील, अशी सूचना माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 21-05-2026