Padma Awards 2026: अभिनेते धर्मेंद्र, भगतसिंह कोश्यारींपासून रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर, भिकल्या लाडक्या धिंडांपर्यंत…कुणाकुणाला पद्म पुरस्कार? राष्ट्रपती भवनात रंगला ‘पद्म पुरस्कार’ सोहळा! पहिल्या टप्प्यात ६६ मान्यवरांना सन्मानित

नवी दिल्ली / मुंबई: देशातील सर्वोच्च नागरी सन्मान मानल्या जाणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘पद्म पुरस्कार २०२६’ (Padma Awards 2026) च्या वितरणाचा पहिला टप्पा अत्यंत दिमाखात पार पडला. राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक ‘गणतंत्र मंडप’ येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशभरातील ६६ मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या भव्य समारंभाला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या.

देशभरात १३१ तर महाराष्ट्रातील १५ मानकरी!

यंदा केंद्र सरकारने एकूण १३१ पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे, ज्यामध्ये ५ पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. एकूण पुरस्कारविजेत्यांमध्ये १९ महिला असून १६ मान्यवरांना मरणोत्तर सन्मान देण्यात आला आहे.

या पहिल्या टप्प्यात २ पद्मविभूषण, ६ पद्मभूषण आणि ५८ पद्मश्री पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे, यंदा महाराष्ट्रातील एकूण १५ मान्यवरांना हा सर्वोच्च सन्मान जाहीर झाला असून, त्यात १ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

पद्म पुरस्कार २०२६: महाराष्ट्रातील विजेत्यांची संपूर्ण यादी (Maharashtra Winners List)

१) पद्मविभूषण (Padma Vibhushan)

  • श्री धर्मेंद्र सिंह देओल (मरणोत्तर): चित्रपट/कला क्षेत्रात अथांग योगदान देणाऱ्या बॉलिवूडच्या ‘हेमॅन’चा देशातील दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने मरणोत्तर गौरव करण्यात आला.

२) पद्मभूषण (Padma Bhushan)

  • सुश्री अलका याज्ञिक (कला): संगीत क्षेत्रातील सुमधुर प्रवासासाठी.
  • श्री उदय कोटक (व्यापार आणि उद्योग): बँकिंग आणि उद्योग क्षेत्रातील कामगिरीसाठी.
  • श्री पीयूष पांडे (कला – मरणोत्तर): जाहिरात आणि कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी.

३) पद्मश्री (Padma Shri)

  • श्री रोहित शर्मा (क्रीडा): भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार.
  • श्री आर. माधवन (कला): अष्टपैलू अभिनेता आणि दिग्दर्शक (नाव यादीत ‘माधवन रंगनाथन’ म्हणून नोंदवले आहे).
  • श्री सतीश शाह (कला – मरणोत्तर): विनोदी आणि अष्टपैलू चित्रपट अभिनेता.
  • श्री रघुवीर तुकाराम खेडकर (लोकनाट्य कला): तमाशा आणि लोककलेचे ज्येष्ठ उपासक.
  • श्री श्रीरंग देवबा लाड (शेती): कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय प्रयोगांसाठी.
  • सुश्री आर्मिडा फर्नांडिस (वैद्यकीय क्षेत्र): नवजात बालके आणि आरोग्य क्षेत्रातील मोलाची सेवा.
  • श्री सत्यनारायण नुवाल (व्यापार आणि उद्योग): उद्योग क्षेत्रातील भरीव योगदान.
  • श्री भिकल्या लडाक्या धिंडा (कला): आदिवासी कला आणि सांस्कृतिक योगदान.
  • श्री अशोक खाडे (व्यापार आणि उद्योग): यशस्वी उद्योजक आणि व्यावसायिक.
  • श्री जनार्दन बापूराव बोथे (समाजकार्य): सामाजिक क्षेत्रातील निस्पृह सेवा.
  • श्री जुझेर वासी (विज्ञान आणि अभियांत्रिकी): वैज्ञानिक क्षेत्रातील संशोधन.

यंदाचे इतर प्रमुख राष्ट्रीय आकर्षण

महाराष्ट्राबाहेरील प्रमुख नावांमध्ये केरळचे माजी मुख्यमंत्री श्री व्ही.एस. अच्युतानंदन (मरणोत्तर) आणि श्री के.टी. थॉमस यांना ‘पद्मविभूषण’ तर उत्तराखंडचे माजी राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी, मल्याळम सुपरस्टार श्री ममूटी, झारखंडचे ज्येष्ठ नेते श्री शिबू सोरेन (मरणोत्तर) आणि अमेरिकेतील प्रसिद्ध टेनिसपटू श्री विजय अमृतराज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

या सोहळ्याचे ठळक मुद्दे (Quick Highlights):

  • पहिले सत्र पूर्ण: पहिल्या टप्प्यात देशातील ६६ मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार सुपूर्द.
  • महाराष्ट्राचे वर्चस्व: एकूण १५ पुरस्कार मिळवत महाराष्ट्राच्या दिग्गजांचा दिल्लीत डंका.
  • मरणोत्तर सन्मान: अभिनेते धर्मेंद्र, सतीश शाह आणि जाहिरात क्षेत्रातील पीयूष पांडे यांना मरणोत्तर पुरस्कार.
  • क्रीडा क्षेत्र: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांना पद्मश्रीचा बहुमान.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 26-05-2026