अंबड (जि. जालना):मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उद्या, ३० मे २०२६ पासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा बेमुदत आमरण उपोषण पुकारले आहे.
मे महिन्यातील भीषण उन्हाची लाट आणि जरांगे पाटील यांनी घेतलेला ‘ना मंडप, ना सावली, ना पाणी’ हा अटीतटीचा पवित्रा लक्षात घेऊन अंबडचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी विजय चव्हाण यांनी २९ मे रोजी थेट जरांगे पाटील यांच्यासह ‘मराठा आरक्षण कोर कमिटी’ला अधिकृत आवाहन पत्रे पाठवून हे उपोषण रोखण्याची विनंती केली आहे. या पत्रामुळे उपोषणाच्या काही तास आधी अंतरवाली सराटीत प्रचंड खळबळ उडाली आहे.
शरीरातील पाणी संपून जिवाला धोका; प्रशासनाला उष्माघाताची भीती!
अंबड तहसीलदारांनी पाठवलेल्या पत्रात प्रशासनाच्या चिंतेची मुख्य कारणे स्पष्ट केली आहेत. मे महिन्याच्या अखेरीस उन्हाचा पारा ४३ ते ४५ अंशांच्या पार गेला आहे. अशा कडक आणि रखरखत्या उन्हात खुल्या जागेवर, कोणताही मंडप न टाकता, अनवाणी पायाने आणि पाण्याचा एक थेंबही न घेता आमरण उपोषण करण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतला आहे. या अत्यंत कठोर स्वरूपामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण अचानक कमी होऊन किंवा तीव्र उष्माघात होऊन त्यांची प्रकृती वेगाने खालावण्याची व जिवाला मोठा आणि प्राणघातक धोका निर्माण होण्याची दाट शक्यता प्रशासनाने पत्रात वर्तवली आहे.
“तुमच्या मागण्या शासनाकडे पाठवल्यात, पण आधी जीव वाचवा!”
तहसीलदार विजय चव्हाण यांनी स्पष्ट केले की, जरांगे पाटील यांनी १८ मे रोजी प्रशासनाला दिलेल्या अधिकृत निवेदनाची दखल घेण्यात आली असून, ते पुढील सकारात्मक कायदेशीर कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांच्यामार्फत राज्य शासनाकडे आधीच रवाना करण्यात आले आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला असला, तरी आंदोलकांच्या जिवाची सुरक्षा राखणे ही प्रशासनाची प्राथमिक आणि नैतिक जबाबदारी आहे, असे चव्हाण यांनी ठणकावून सांगितले आहे.
कोर कमिटीला थेट साकडे
या पत्राद्वारे प्रशासनाने मराठा आरक्षण कोर कमिटीच्या प्रमुख सदस्यांना थेट मध्यस्थी करण्याचे आवाहन केले आहे. कमिटीच्या सदस्यांनी स्वतः तात्काळ जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांना या भीषण उन्हात आणि जीवघेण्या पद्धतीचे उपोषण करण्यापासून परावृत्त करावे, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.
२४ तास वैद्यकीय यंत्रणा सज्ज!
दुसरीकडे, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पूर्व-उपाययोजना म्हणून जिल्हा शल्य चिकित्सकांना उपोषणस्थळी २४ तास विशेष वैद्यकीय पथक, अत्याधुनिक रुग्णवाहिका व जीवरक्षक औषधोपचार सज्ज ठेवण्याचे आणि पोलीस प्रशासनाला कायदा-सुव्यवस्था राखण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. आता प्रशासनाच्या या अधिकृत आवाहनानंतर जरांगे पाटील आणि त्यांची कोर कमिटी उपोषणाच्या काही तास आधी काय पाऊल उचलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:02 29-05-2026













