रत्नागिरी : जाकादेवी प्रशालेची वेटलिफ्टिंगमध्ये बाजी

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर देदिप्यमान कामगिरी करून विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण १४ विद्यार्थ्यांची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हा कार्यालयाच्या अंतर्गत क्रीडा परिषद यांच्यामार्फत रत्नागिरी येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुनील ऊर्फ बंधू मयेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात जाकादेवी विद्यालयाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यामध्ये जाकादेवी विद्यालयातून वय वर्षे १७ वयोगटातून तन्मय घाणेकर, धीरज मायंगडे, श्रावणी कांबळे, तनवी धामणे, श्रेया घवाळी, पायल वेजरे, कार्तिकी देसाई यांची निवड झाली आहे.

या स्पर्धेत १९ वयोगटातून राज धामणे, शंतनू कातकर, रोहित धामणे, यश गोणबरे, सानिका घाणेकर, अमिषा धामणे, ऋतुजा कुळये अशा एकूण १४ विद्यार्थ्यांची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात निवड झाली आहे.

जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या जिल्हा वेटलिफ्टिंग असा. मधून जाकादेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करून जिल्ह्यात आपले वर्चस्व कायम ठेवले. जनरल चॅम्पियनशिपचा बहुमानही जाकादेवी विद्यालयाला मिळाला. यावेळी या स्पर्धेत मेडालिस्ट व ज्युनियर बेस्ट लिफ्टर म्हणून घोषित करण्यात आले. यामध्ये गोल्ड मेडालिस्ट म्हणून जाकादेवी कनिष्ठ महाविद्यालयातील राज धामणे, निर्मित दसम, हर्ष सनगरे, श्रेया घवाळी तर ज्युनियर बेस्ट लिफ्टर ऑफ रत्नागिरी २०२४ चा बहुमान तन्मय घाणेकर, तर सब ज्युनिअर लिफ्टरचा बहुमान धीरज मायंगडे आणि पायल वेजरे यांना घोषित करण्यात आला. स्पर्धेतील सिल्व्हर मेडलचा सन्मान कनिष्ठ महाविद्यालयातील संकेत धामणे, ऋतुजा कुळये यांनी संपादन केला. ही स्पर्धा रत्नागिरी येथील शिवाजी स्टेडियम झोरेज् स्पोर्टस् अॅकॅडमी येथे संपन्न झाल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:13 PM 24/Sep/2024