Pune crime : स्वारगेट प्रकरणातील आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चिती; ८७ साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर

पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चिती करण्यात आली असून, विशेष सरकारी वकिलांकडून सोमवारी (दि. १) ८७ साक्षीदारांसह आरोपीच्या विरोधातील पुराव्यांची यादी न्यायालयात सादर करण्यात आली आहे.

या खटल्याची पुढील सुनावणी दि. १५ जून रोजी होणार आहे.

स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याने तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळच्या सुमारास पावणेसहा ते पावणेसातच्या दरम्यान घडली होती. त्यानंतर गाडे घटनास्थळावरून फरार झाला होता. तो आपल्या गावातील शेतात लपून बसला होता.

पुणे पोलिसांनी त्याला अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या ५२ दिवसांत पोलिसांनी ८९२ पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.

तपासादरम्यान ८२ साक्षीदारांची चौकशी करण्यात आली. एकूण १२ पंचनामे करण्यात आले असून, त्यात गुगल सर्च हिस्टरी, तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी, ओळख परेड, सीसीटीव्ही फुटेज आणि निवेदने या पाच महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. या पंचनाम्यांमधून आरोपी गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असल्याचे थेट तसेच परिस्थितीजन्य पुरावे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहेत. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर काम पाहत असून, पीडितेच्या वतीने ॲड. श्रीया आवले बाजू मांडत आहेत. घटनेला वर्ष उलटल्यानंतर आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चिती करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 03-06-2026