◼️ मसुरी येथील आयटीबीपी अकॅडमीतील अत्यंत खडतर प्रशिक्षण पूर्ण; स्टेथोसोपसोबतच आता देशरक्षणासाठी हाती घेणार शस्त्र
अमरावती: Dr. Yugandhara Bhonde | अर्थात एका बाजूला डॉक्टर म्हणून रुग्णसेवा करण्याची वैद्यकीय जबाबदारी, दुसऱ्या बाजूला पदरात अवघ्या एक वर्षाचे लहान लेकरू, पण मनात देशसेवेची दांडगी इच्छाशक्ती आणि डोळ्यात एक मोठं स्वप्न. याच ध्यासाने अनेक अडचणींवर मात करत अमरावतीच्या डॉ. युगंधरा भोंडे यांनी सैन्यदलात जाण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे. जिद्द, कठोर मेहनत आणि कमालीच्या दृढनिश्चयाच्या जोरावर त्यांनी मसुरीच्या आयटीबीपी (ITBP) अकॅडमीतील अत्यंत खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले असून, आता त्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात असिस्टंट कमांडंट मेडिकल ऑफिसर (क्लास वन) म्हणून देशसेवेची नवी जबाबदारी सांभाळणार आहेत.
एम्समधील अनुभवानंतर सैन्यात जाण्याचा धाडसी निर्णय
डॉ. युगंधरा या दिवंगत प्रा. हरिदास आणि संध्या भोंडे यांच्या कन्या असून त्यांना घरातूनच समाजसेवेचा समृद्ध वारसा मिळाला आहे. अमरावतीच्या पीडीएमसी महाविद्यालयातून त्यांनी आपले एमबीबीएसचे (MBBS) वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. विवाहानंतर त्यांनी दिल्लीच्या प्रतिष्ठित एम्स (AIIMS) रुग्णालयातही काम केले. त्यांचे पती प्रतीक सोनारे हे यूपीएससी (UPSC) परीक्षा उत्तीर्ण करून आधीच फोर्सेसमध्ये उच्चपदावर कार्यरत आहेत. पतीची देशसेवा आणि त्यांचे समर्पण पाहून युगंधरा यांनाही सैन्यात जाण्याची मोठी प्रेरणा मिळाली. फोर्सेसमध्ये केवळ लढवय्या जवानांचीच नव्हे, तर सैनिकांचे प्राण वाचवणाऱ्या खंबीर डॉक्टरांचीही तेवढीच गरज असते, हे ओळखून त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला.
हाडे गोठवणारी थंडी आणि बंदूक चालवण्याचे खडतर प्रशिक्षण
असिस्टंट कमांडंट मेडिकल ऑफिसर या उच्च पदावर निवड झाल्यानंतर डॉ. युगंधरा यांना मसुरी येथील आयटीबीपी अकॅडमीत सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. युद्धप्रसंगी किंवा आणीबाणीच्या वेळी थेट सीमेवर जाऊन लढा देण्याची पूर्वतयारी म्हणून हे प्रशिक्षण अत्यंत काठीण्य पातळीचे होते. येथे नुसते वैद्यकीय ज्ञान पुरेसे नव्हते, तर प्रसंगी हातात बंदूक घेऊन शत्रूचा सामना करण्याचे लष्करी कौशल्यही त्यांना आत्मसात करावे लागले. मसुरीच्या अवघड डोंगर-दऱ्यांमधील हाडे गोठवणारी थंडी, घनदाट जंगलातील वास्तव्य आणि सलग तीन-तीन दिवस केवळ एक लिटर पाण्यावर तग धरून राहणे, अशा अनेक कठीण शारीरिक आणि बौद्धिक चाचण्यांवर मात करत त्यांनी हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. यापूर्वी अमृतसर येथे ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पोस्टिंग असतानाही त्यांनी अशा कठीण परिस्थितीचा धीरोदात्तपणे सामना केला होता.
मातृत्व आणि कर्तव्याचा यशस्वी समन्वय
या संपूर्ण प्रवासात डॉ. युगंधरा यांच्यासमोर आपल्या अवघ्या एक वर्षाच्या चिमुकल्या लेकीपासून दूर राहण्याचे सर्वात मोठे भावनिक आव्हान होते. एका आईसाठी आपल्या तान्ह्या बाळाला सोडून देशसेवेचे व्रत घेणे अत्यंत कठीण होते. मात्र, या संघर्षाच्या काळात त्यांचे सासू-सासरे डॉ. सरोज आणि डॉ. चंद्रकांत सोनारे यांनी नातीची संपूर्ण जबाबदारी सांभाळली. पती प्रतीक सोनारे यांच्या अभेद्य पाठींब्यामुळे आणि कुटुंबाच्या भक्कम साथीमुळे डॉ. युगंधरा यांचे हे स्वप्न साकार होऊ शकले. स्टेथोस्कोप धरणारे हात प्रसंगी देशाच्या रक्षणासाठी शस्त्रही तेवढ्याच सहजतेने पेलू शकतात, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 04-06-2026














