Monsoon Update : देशभरातील शेतकरी आणि नागरिक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो नैऋत्य मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला आहे.(Maharashtra Monsoon Update)
निर्धारित तारखेपेक्षा तीन दिवस उशिराने आलेला मान्सून आता कर्नाटक, गोवा मार्गे महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने सरकत आहे.
(Maharashtra Monsoon Update)
दरम्यान, ८ जूनपर्यंत राज्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि पूर्वमोसमी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.(Maharashtra Monsoon Update)
नैऋत्य मान्सूनने अखेर केरळमध्ये प्रवेश केला असून, यंदा तो आपल्या निर्धारित तारखेपेक्षा सुमारे तीन दिवस उशिराने देशाच्या मुख्य भूभागावर दाखल झाला आहे. (Maharashtra Monsoon Update)
गुरुवार (४ जून) रोजी मान्सूनने संपूर्ण केरळ राज्य व्यापले असून तामिळनाडूतील कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थुथुकुडी तसेच कर्नाटकातील काही भागांपर्यंत प्रगती केली आहे.
हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (निवृत्त, भारतीय हवामान विभाग, पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सूनची वाटचाल आणखी वेगाने होण्याची शक्यता आहे.
सध्याची हवामान परिस्थिती मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल असल्याने तो कर्नाटक, तामिळनाडूचा उर्वरित भाग आणि संपूर्ण गोवा व्यापून महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचू शकतो.
वेंगुर्ल्याच्या दिशेने मान्सूनची वाटचाल
सध्या निर्माण झालेली हवामान प्रणाली आणि अरबी समुद्रातील पोषक वातावरण पाहता, मान्सून प्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला परिसरात दाखल होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
पुढील काही दिवसांत मान्सूनच्या प्रगतीवर हवामान विभागाचे बारकाईने लक्ष राहणार आहे.
महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाला जोर
मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वीच राज्यातील अनेक भागांत पूर्वमोसमी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, ८ जूनपर्यंत मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी पडू शकतात.
या काळात वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असून, शेतकरी आणि नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान प्रणाली ठरत आहे पोषक
सध्या मराठवाडा ते कोकण आणि गोवा मार्गे नैऋत्य अरबी समुद्रापर्यंत समुद्रसपाटीपासून सुमारे ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत कमी दाबाचा आस (Trough) सक्रिय आहे. ही प्रणाली मान्सूनच्या पुढील प्रवासाला चालना देण्यास मदत करत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.
यामुळे आगामी काही दिवसांत महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, मेघगर्जनेसह पाऊस आणि मान्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
पूर्वमोसमी पावसामुळे अनेक भागांत पेरणीसाठी पोषक वातावरण तयार होत असले तरी, मान्सून स्थिरपणे दाखल होईपर्यंत घाईघाईने पेरणी करू नये, असा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून दिला जात आहे. पुढील काही दिवसांतील पावसाच्या सातत्यावर लक्ष ठेवूनच खरीप हंगामातील निर्णय घेणे योग्य ठरेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 05-06-2026














