Shivrajyabhishek Din Sohala 2026: किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, शिवभक्तांच्या अलोट गर्दीने अवघा गड दुमदुमला..

सुवर्णमुद्रांचा अभिषेक, ढोल-ताशांचा गजर अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी किल्ले रायगडावर अवतरला शिवकाळ

किल्ले रायगड: Shivrajyabhishek Din 2026 अंतर्गत आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५२ वा भव्य शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर अत्यंत उत्साहात आणि नेत्रदीपक पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देशभरातून आणि जगभरातून लाखो शिवभक्तांची मांदियाळी रायगडावर दाखल झाली आहे. गडावर पहाटेपासूनच सुरू झालेल्या विविध धार्मिक, पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे अवघा रायगड परिसर शिवमय झाला असून महाराजांच्या जयजयकाराने संपूर्ण गड दुमदुमून गेला आहे.

राजसदरेवर आकर्षक सजावट; ध्वजवंदनाने सोहळ्याचा प्रारंभ

ऐतिहासिक राज सदरेवरील मेघडंबरीला विविध प्रकारच्या फुलांची अत्यंत आकर्षक सजावट करण्यात आली आहे. गडावर फडकणारे भगवे झेंडे, पताका, शाहिरांचे पोवाडे आणि शिवभक्तांचा उत्साह यामुळे गडावरील वातावरण भारावून गेले आहे. आज सकाळी या सोहळ्याची अधिकृत सुरुवात दिमाखदार ध्वजवंदनाने झाली. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि अलोट उत्साहात शिवपालखी वाजत-गाजत राजसदरेवर आणली गेली, जिथे शिवराज्याभिषेकाचा मुख्य सोहळा संपन्न होत आहे.

सुवर्णमुद्रांचा अभिषेक आणि जगदीश्वर मंदिरापर्यंत पालखी मिरवणूक

मुख्य सोहळ्यादरम्यान उत्सव मूर्तीस रीतसर अभिषेक करण्यात आला. यानंतर सिंहासनारूढ शिवपुतळ्याला अत्यंत भक्तीभावाने सुवर्ण मुद्रांचा अभिषेक (सुवर्णनाणी अर्पण) करण्यात आला. हा सोहळा सुरू असताना शिवभक्तांनी केलेल्या जयघोषाने राजसदर परिसर प्रतिध्वनित झाला. युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनानंतर, राजसदर ते थेट जगदीश्वर मंदिर अशी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाला (शिवसमाधी) अभिवादन करून या मुख्य सोहळ्याची सांगता केली जाईल.

गडाच्या पायथ्याशी पाऊल ठेवण्यास जागा नाही; शिवकाळाची अनुभूती

किल्ले रायगडावर जेवढी गर्दी आहे, तितकीच किल्ले रायगडाच्या पायथ्याशी आणि खालील परिसरात शिवभक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. गडावर विविध सांस्कृतिक, पारंपरिक खेळ आणि लोकनृत्यांचे सादरीकरण करण्यात येत आहे. या सर्व कलाप्रकारांमुळे उपस्थित साऱ्यांनाच थेट शिवकाळाची अनुभूती येत आहे. प्रशासनाकडून आणि स्थानिक शिवप्रेमी संस्थांकडून येणाऱ्या शिवभक्तांसाठी विविध सोयी-सुविधा पुरवल्या जात आहेत.

कोल्हापुरातील ऐतिहासिक ‘नवीन राजवाड्या’तही दिमाखदार सोहळा

दुसरीकडे, कोल्हापूर येथेही ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. ऐतिहासिक नवीन राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये या मुख्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या आधी नवीन राजवाड्याच्या प्रांगणात ढोल-ताशा पथकांनी दर्जेदार सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. राजवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णमूर्तीवर मंत्रोच्चारात दुग्धाभिषेक करण्यात येत असून, या मंगलमय सोहळ्याला कोल्हापुरातील अनेक मान्यवर, इतिहासप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 06-06-2026