मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्य परिवहन महामंडळाने राज्यभर अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला आहे. एसटी स्थानके, बसेस, चालक-वाहक विश्रांतिगृहे आणि प्रसाधनगृहे यांची दर चार तासांनी स्वच्छता केली जाणार आहेत.
तसेच डिझेल व सुट्ट्या भागांच्या वाढलेल्या खर्चामुळे महामंडळावर आर्थिक ताण वाढला असून, भविष्यात एसटी भाडेवाढीचा विचार होऊ शकतो, असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी सांगितले.
एसटीच्या ताब्यात ७०० हून अधिक स्वच्छतागृहे
गेल्या अनेक वर्षांपासून काही ठराविक व्यक्तींना स्वच्छतागृहे चालविण्यासाठी देण्यात आली होती. मात्र, आता राज्यातील ७००हून अधिक स्वच्छतागृहे एसटी महामंडळाने पुन्हा ताब्यात घेतली आहेत. प्रवाशांनी बसस्थानकांतील स्वच्छतागृहांसाठी कोणतेही शुल्क देऊ नये, त्याची संपूर्ण जबाबदारी एसटी महामंडळाची असेल, त्यासाठी परिवहन महामंडळाने स्वच्छतेसाठी स्वतंत्र ठेकेदाराची नियुक्ती केली आहे, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
डिझेल दरवाढीमुळे ४१० कोटींचा फटका
डिझेलच्या दरात तीनवेळा वाढ झाली असून, त्यामुळे महामंडळाला वार्षिक सुमारे ३१० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागतो. याशिवाय सुटे भाग व इतर खर्च वाढल्याने एकूण आर्थिक फटका ४१० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात तिकीट दरवाढ करण्याचा विचार करावा लागू शकतो.
संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणार
सरनाईक म्हणाले की, अनेक डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसेसमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या व पिशव्यांचा खच आढळतो. स्वच्छतेच्या बाबतीत तडजोड केली जाणार नसून तसे आढळल्यास स्थानकावरील अधिकाऱ्यास जबाबदार धरत कडक कारवाई केली जाईल.
प्रवाशांच्या सुविधांसाठी साफसफाईनंतर चालकांकडे सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच प्रवासादरम्यान उलट्यांचा त्रास होणाऱ्या प्रवाशांसाठी गोळ्या व पिशव्यांचीही व्यवस्था केली जाईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:18 06-06-2026














