‘बीएनएचएस’ आणि वनविभागाची संयुक्त कामगिरी; ‘शेड्युल १’ मधील दुर्मीळ जीवांचे यशस्वी पुनर्वसन
रत्नागिरी: ‘Ratnagiri Sea Horse Rescue’ | रत्नागिरी येथील मिऱ्या, काळबादेवी आणि शिरगाव खाड्यांमध्ये मासेमारीच्या जाळ्यांमध्ये अडकलेल्या तीन समुद्री घोड्यांना (सी हॉर्स) सुरक्षितपणे वाचवून त्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच समुद्रात सोडण्यात आले आहे. हे समुद्री घोडे वन्यजीव संरक्षण कायद्याच्या ‘शेड्युल १’ (परिशिष्ट १) मधील अत्यंत दुर्मीळ आणि संरक्षित जीव असल्यामुळे, त्यांच्या संवर्धनासाठी किनारपट्टी भागात विशेष प्रयत्न सुरू आहेत.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) आणि वनविभागाच्या कांदळवन कक्षाच्या संयुक्त पथकाने या समुद्री घोड्यांना जीवदान देण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. रत्नागिरीच्या किनारी भागात स्थानिक मच्छीमारांच्या जाळ्यात हे तीन समुद्री घोडे अडकले होते. जाळ्यातून सुटका केल्यानंतर, हे जीव पूर्णपणे निरोगी होईपर्यंत त्यांना रत्नागिरी येथील ‘बीएनएचएस’च्या फिल्ड स्टेशनमधील पुनर्वसन केंद्रातील नियंत्रित वातावरणात देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.
सागरी शास्त्रज्ञ डॉ. तेजल विजयपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या तिन्ही समुद्री घोड्यांची अत्यंत काळजीपूर्वक देखभाल करण्यात आली. पुनर्वसन केंद्रात त्यांची आवश्यक ती पशुवैद्यकीय आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली. हे तिन्ही जीव समुद्रात जाण्यासाठी पूर्णपणे सक्षम असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, त्यांना पुन्हा सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले. या मोहिमेप्रसंगी वनक्षेत्र अधिकारी किरण ठाकूर, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे डॉ. हरीश धामगये, मत्स्यपालन महाविद्यालयाचे डॉ. जी. एस. घोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मॅंग्रोव्ह अँड मरीन बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्हेशन फाउंडेशनच्या (MMBCF) सहकार्याने २०२४ पासून महाराष्ट्राच्या संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर ‘समुद्री घोडा संवर्धन प्रकल्प’ प्रभावीपणे राबवला जात आहे. या प्रकल्पांतर्गत केलेल्या शास्त्रीय सर्वेक्षणामध्ये समुद्री घोड्यांचे प्रमुख अधिवास ओळखण्यात संशोधकांना यश आले आहे. याशिवाय, संस्थेने स्थानिक मच्छीमारांचे एक विशेष पथक स्थापन केले असून, याद्वारे मासेमारी करताना जाळ्यात सापडलेल्या समुद्री घोड्यांची त्वरित माहिती देण्यास व त्यांची सुरक्षित सुटका करण्यास मच्छीमारांना सातत्याने प्रोत्साहन दिले जात असल्याची माहिती ‘बीएनएचएस’च्या सागरी शास्त्रज्ञ डॉ. तेजल विजयपुरे यांनी दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:45 08-06-2026














