‘पहिले पाऊल’ अंतर्गत कागदावर घेतला जाणार पायाचा ठसा; मोफत पुस्तके आणि गणवेशाचे वाटप
रत्नागिरी: ‘Ratnagiri ZP School Admission’ | उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर येत्या १५ जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा नवोदित विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिलीच्या वर्गात तब्बल १० हजार ९१ विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत. शाळांच्या पहिल्याच दिवशी या चिमुरड्यांचा शिक्षणाचा श्रीगणेशा अत्यंत उत्साहात आणि ढोल-ताशांच्या गजरात, वाजतगाजत केला जाणार असून, यासाठी शिक्षण विभागाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात अधिक आकर्षक आणि संस्मरणीय करण्यासाठी शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली आहे. शासनाच्या ‘पहिले पाऊल’ या विशेष संकल्पनेअंतर्गत, पहिलीत दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या पायाचा ठसा कागदावर उमटवून हा ऐतिहासिक क्षण आठवण म्हणून जतन केला जाणार आहे. याशिवाय, पहिल्याच दिवशी सर्व नवोदित मुलांना शासनातर्फे मोफत पाठ्यपुस्तके आणि नवीन गणवेशाचे (युनिफॉर्म) वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळांमध्ये १०० टक्के पटनोंदणी व्हावी, यासाठी शिक्षण विभागाने यंदा विशेष मोहीम हाती घेतली होती.
शाळेच्या पहिल्या दिवशी जून महिन्यातील उन्हाचा त्रास लहान मुलांना होऊ नये, यादृष्टीने प्रशासनाने शाळांना विशेष सूचना दिल्या आहेत. सर्व शाळांमध्ये पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था आणि वर्गखोल्यांसह परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, पहिल्याच दिवशी ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने’अंतर्गत विद्यार्थ्यांना अत्यंत दर्जेदार आणि चवदार भोजन दिले जाणार आहे.
मागील काही वर्षांत जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या कमी होत असल्याचा आलेख पाहायला मिळत होता. ही स्थिती बदलण्यासाठी आणि आपल्या शाळेचा पट टिकवून ठेवण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विशेष प्रयत्न केले, ज्याला आता मोठे यश आले आहे. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून पहिलीच्या वर्गात १० हजार ९१ मुलांनी नावनोंदणी केल्यामुळे शाळांची पटसंख्या सुधारली आहे. १५ जून रोजी शाळा सुंदर फुलांनी व फुग्यांनी सजवून, विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करत त्यांचे स्वागत करण्यासाठी रत्नागिरीचा शिक्षण विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:45 08-06-2026














